जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगावमध्ये मकरसंक्रांतीच्या दिवशी दोन दुर्दैवी घटना घडल्या आहेत. या दोन घटनांमध्ये पतंगाच्या नादात दोन मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामधील एका घटनेत पतंग उडवण्यासाठी जाऊ दिलं नाही म्हणून 12 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले आहे तर दुसऱ्या घटनेत पतंग उडवताना विजेच्या तारांचा शॉक लागून 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.
काही तासांच्या अंतराने या घटना घडल्याने संपूर्ण जळगाव शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जळगावकरांसाठी आजचा दिवस दुःखदायक ठरला आहे. पतंगाच्या नादात दोन मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. जळगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या कुसुंबा गावमध्ये पहिली घटना घडली आहे. यामध्ये पतंग उडवत असताना विजेचा शॉक लागून हितेश ओंकार पाटील याचा मृत्यू झाला आहे.
तर दुसरी घटना हि जळगाव शहरातील कांचननगर या परिसरात घडली आहे. घरच्यांनी पतंग उडवण्यासाठी जाऊ दिले नाही म्हणून यश रमेश राजपूत याने झोक्याच्या दोरीने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. वयात आलेल्या मुलांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.