मुंबई । निसर्ग चक्रीवादळाने राज्यात मोठे नुकसान झाले.चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला बसला आहे. या जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. घरांची मोठी पडझड झाली असून वृक्षही कोसळून पडलेत. शेतीच्या नुकसानासोबतच महावितरण कंपनीचेही मोठे नुकसान झाले आहे. चक्रीवादळांचे ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे, त्यांना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जास्तीची मदत करणार असल्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.
निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना राज्य सरकारचा एनडीआरएफच्या ( NDRF) नियमापेक्षा जास्त मदत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. पूर्ण नष्ट झालेल्या घराला दीड लाखांची मदत मिळणार आहे. यापूर्वी ९५ हजार मिळत होते. तर काही प्रमाणात पडझड झाली आहे त्यांना ६ हजाराहून आता १५ रुपये मिळणार आहे. घरांची पडझड झाली नाही मात्र नुकसान झालं आहे, त्यांना ३५ हजार रुपये देण्यात येणार आहेत.
NDRF च्या निकषांच्यावरती जो खर्च लागेल, तो राज्य सरकार देणार आहे. तसा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. नुकसान झालेल्याना १० हजार रोख रक्कम देण्यात येणार आहे. शेतीचे हेक्टरी नुकसान झालेल्या शेताला २५ हजाराहून ५० हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे. तर कम्युनिटी किचन सुरु करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच पुढील २ महिने मोफत धान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे नुकसाग्रस्तांच्या पोटापाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”




