कोल्हापूर | कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूकीत पहिल्या फेरीपासून मतमोजणीत काॅंग्रेसने आघाडी घेतलेली असून ती 16 व्या फेरीअखेर कायम ठेवली आहे. सोळाव्या फेरीअखेर काॅंग्रेसच्या जयश्री जाधव यांनी 13 हजार 789 मतांची आघाडी घेतली आहे. मोठ्या प्रमाणावर मताधिक्य घेतल्याने काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कसबा बावड्यासह कोल्हापूर शहरात विजयाचे बॅनर लावले आहेत. कॉंग्रेसकडून जयश्री जाधव आणि भाजपकडून सत्यजित कदम हे दोन उमेदवार या निवडणुक रिंगणात होते. सोळाव्या फेरीअखेर जयश्री जाधव यांना निर्णायक 13 हजार 789 मतांचे मताधिक्य मिळाले आहे.
कॉंग्रेसचे पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या दोन दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मदतीने कोल्हापूरची पोटनिवडणूकीत काॅंग्रेसने विजय निश्चित केला आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल थोड्या वेळात लागणार आहेत. यासाठी मतमोजणी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. कसबा बावड्यात महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांच्या विजयाचे पोस्टर्स सकाळी 9 वाजता झळकण्यास सुरूवात केली होती.
राज्याचे लक्ष लागून राहीलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत सोळाव्या फेरीत काँग्रेसच्या श्रीमती जयश्री जाधव यांनी 13 हजार 789 मतांची आघाडी घेतली आहे. सोळाव्या फेरीत श्रीमती जाधव यांना 3 हजार 638 तर भाजपचे सत्यजित कदम यांना 3 हजार 847 मते मिळाली. सोळाव्या फेरीअखेर जयश्री जाधव यांना 61 हजार 989 तर सत्यजित कदम यांना 48 हजार 200 मते मिळाली आहेत. आता केवळ शेवटच्या 10 फेऱ्या मतमोजणी करण्याचे बाकी असून जयश्री कदम किती मतांचे लीड घेतायत की सत्यजित कदम काय करिष्मा करतायत याकडे कोल्हापूरसह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
करूणा शर्मा- मुंडेंचे डिपाॅझिट वाचणार का?
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या पत्नी करूणा शर्मा- मुंडे या कोल्हापूरची पोटनिवडणूक लढवित आहेत. मतमोजणीत 11 व्या फेरीअखेर करूणा यांनी मतांचे अर्धशतक पूर्ण केले असून 61 मते मिळाली आहे. करूणा शर्मा यांचे डिपाॅझिट जप्त होवू शकते अशी परिस्थिती सध्याच्या मतांच्या आकड्यावरून दिसत आहे.