महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ : कोथरूडमध्ये भाजप पुन्हा मुसंडी मारणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी |  पुण्यातील हिंदुत्ववादी पक्षांचे माहेरघर म्हणून ओळखला जाणारा कोथरूड विधानसभा मतदारसंघ १५ वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असताना देखील हिंदुत्ववादी पक्षांच्याच ताब्यात राहिला. १९८२ पासून आज तागायत या मतदारसंघात काँग्रेस अथवा राष्ट्रवादी आपला उमेदवार निवडून आणू शकली नाही. सध्या भाजपच्या मेधा कुलकर्णी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. यांनी पुन्हा भाजपच्या तिकिटावर दावा सांगितला आहे.

१९८२ साली भाजपच्या अण्णा जोशी यांनी या मतदारसंघात सर्वप्रथम विजय मिळवला. त्यानंतर १९८६साली देखील त्यांनीच विजय संपादित केला. त्यानंतर १९९० साली सेना भाजप युतीत भाजपने उदार अंतःकरणाने हा विद्यमान आमदार असणारा मतदारसंघ शिवसेनेला सोडला. तेव्हा या मतदारसंघात शिवसेनेच्या शशिकांत सुतार यांनी विजय संपादित केला. त्यानंतर त्यांनी सलग विजय संपादनाची शृंखलाच उभा केली. २००९ साली शिवसेनेने या मतदारसंघात तिकीट बदलून चंद्रकांत मोकाटे यांना उमेदवारी दिली. तरी देखील येथील मतदारांनी शिवसेनेची साथ सोडली नाही. चंद्रकांत मोकाटे देखील या मतदारसंघात विजयी झाले. मात्र २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीला भाजप आणि शिवसेना वेगळे लढण्याचा शिवसेनेला तोटा सहन करावा लागला आणि कोथरूडच्या गड जय श्रीरामच्या घोषणात भाजपने शिवसेनेच्या ताब्यातून हिस्कावाला. २०१४ साली भाजपच्या मेधा कुलकर्णी जवळपास ६५ हजारांच्या फरकाने विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्या.

आगामी विधानसभा निववडणुकीसाठी भाजपकडून विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी पुन्हा इच्छुक आहेत. तर मागच्या वेळी उमेदवारी पासून वंचित राहिलेले मुरलीधर मोहळ पुन्हा भाजपच्या उमेदवारीसाठी जोर लावत आहेत. त्याच प्रमाणे युतीत हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सुटावा यासाठी येथील शिवसैनिक आग्रही आहेत. शिवसेनेकडून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, माजी नगरसेवक शाम देशपांडे, नगरसेवक पृथ्वीराज सुतार हे इच्छुक आहेत. तर काँग्रेस आघाडीत मनसे सामील झाल्यास हा मतदारसंघ मनसेला सोडण्यात येण्याची शक्यता आहे. मनसेला मतदारसंघ सुटल्यास किशोर शिंदे आपले नशीब आजमावणार आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या गिरीश बापट यांना कोथरूड मतदारसंघातून १ लाख ६ हजार मतांचे मताधिक्य मिळाले आहे. त्यावरून या मतदारसंघात भाजपचं विजयी होणार हे दिसून आले आहे. उमेदवारी मिळणे हाच विजय असल्याने भाजपचे इच्छुक उमेदवारीसाठी मुष्टीयुद्ध खेळत असल्याचे बघायला मिळते आहे.