हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर त्यांच्यासाठी धावून आल्या. नवाब मलिक हे खोटं बोलत असून त्यांचे बोलणे हे बायकांच्या चोमडेपणा सारखे आहेत असा टोला त्यांनी लगावला.
नबाव मलिक यांचे सगळे खोटे आरोप आहेत. त्यांच्याकडे पुरावे असतील ते पुरावे कोर्टात सादर करतील. ट्विटरवर कोणीही उठून काहीही लिहू शकतं. तुम्ही वानखेडेंच्या पूर्ण गावाचं आणि कुटुंबाचं सर्टिफिकेट पाहा. डॅडींनी काल ते दाखवलं होतं. आख्ख गाव कसं वेगळं सर्टिफिकेट करून घेईल. तसंच त्यांचं बर्थ सर्टिफिकेट ऑनलाईन उपलब्ध का नाही याचा नवाब मलिकांशी शोध घ्यावा,” असं क्रांती रेडकर यांनी म्हटलंय.
समीर वानखेडे जर पदावरुन हटले तर त्याचा फायदा कुणाला? वानखेडेंमुळे अनेकांचे नुकसान होत असेल. त्यामुळे कदाचित अशाप्रकारे आरोप करून त्यांना या पदावरुन हटवावं यासाठी हे सुरु आहे अशी शंका त्यांनी व्यक्त केली. बिनबुडाचे आरोप करुन बदनाम करण्याचं काम नवाब मलिकांनी केले. बायकाही असं वागत नाहीत. हा तर किचनमधला चोमडेपणा आहे अशी टीका त्यांनी केली.