Friday, June 9, 2023

पाटण तालुक्यात पुन्हा भूस्खलन : प्रशासन सतर्क

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यातील डोंगर- दऱ्यातील पाटण तालुक्यात सलग दुसऱ्या वर्षी भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या 4-5 दिवसांपासून पाटण तालुक्यासह जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. काटे- अवसरी परिसरातील खुडपुलेवाडी आणि जितकरवाडी येथे भूस्खलन झाल्याचे ट्विट प्रातांधिकारी सुनील गाढे यांनी केले आहे.

गेल्या वर्षी पाटण तालुक्यात भुस्खलनाच्या घटना घडून अनेकांचा जीव गेला होता. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क असून त्यांनी भूस्खलन झालेल्या ठिकाणच्या ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. प्रशासनाने या भागात एकेरी रस्ताही सुरू केला. त्यानंतर या भागातील धाेका लक्षात घेता तेथील ग्रामस्थांशी चर्चा केली. या चर्चेअंती ग्रामस्थांचे तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतर करण्यात आले. स्थलांतरित केलेल्या ग्रामस्थांना सुविधा दिल्या जात असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

जितकरवाडी (ता.पाटण) येथे भुसख्खलन होण्याची शक्यता असल्याने तेथील ग्रामस्थांना जिंती येथील शाळेत तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित केले आहे. स्थलांतरित ग्रामस्थांना प्रशासनाच्या माध्यमातून सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत अशी माहिती प्रांताधिकारी सुनिल गाढे यांनी दिली.