सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रतापगड येथील अफजलखान कबरी जवळ असणाऱ्या वळणावर रस्त्यावर काल रात्री दरड कोसळली आहे. दरड कोसळल्याने प्रतापगडकडे जाणारी सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरड हटवण्याचे काम बांधकाम विभाग प्रशासनाच्या वतीने युध्दपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावली, कोयनाधरण परिसरात मंगळवारी दिवसभर पावसाने हजेरी लावली. डोंगर कपारे असलेल्या परिसर निसरटे झाले आहेत. त्यामुळे महाबळेश्वर- मेढा, महाबळेश्वर- वाई, महाबळेश्वर- प्रतापगड या मार्गावर अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे वाहन चालकांनी काळजीपूर्वक वाहन चालवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने दरड हटविण्यास अडथळा निर्माण होत आहे. साधारण 4 तासांत ही दरड हटवण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. सध्या एकेरी वाहतूक काही तासानंतर सुरू झाली आहे, मात्र ती धोकादायक पध्दतीने सुरू असल्याने वाहन चालकांनी या मार्गावरील प्रवास टाळावा.
कुडाळ- मेढा घाटातही दरड कोसळली
मेढा- जावळी तालुक्यामध्ये सध्या डोंगरी पट्ट्यात मुसळधार पाऊस सुरू असून कुडाळ- मेढा घाट रस्त्याच्या दरम्यानच मेढा मरड मुरे घाटामध्ये आज सकाळी दरड कोसळली. यामुळे या घाटातील वाहतूक वाहन चालकांसाठी धोकादायक बनली आहे. दरवर्षी पावसाळ्यात घाटामध्ये दरडी कोसळण्याचे प्रमाण अधिक आहे. अद्यापही कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र संरक्षक कठडे व निसरडे घसरडे रस्ते असल्याने मोठ्या अपघाताची भीती व्यक्त होत आहे.