नवी दिल्ली । कोरोना महामारीने देशभरात थैमान घातलं आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. गेल्या २४ तासांत देशात ५२ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १८ लाखांच्या पुढे गेली आहे. दरम्यान, अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. काही लोकप्रतिनिधींना कोरोनामुळे आपला जीवही गमवावा लागला आहे. अशातचं मागील २४ तासांत भाजपाच्या पाच नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
गृहमंत्री अमित शाह
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना रविवारी करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. करोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने चाचणी केली असता आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं अमित शाह यांनी सांगितलं. अमित शाह यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणार असल्याची माहिती दिली आहे. अमित शाह एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत.
अमित शाह यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “कोरोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने आपण चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती ठीक आहे, पण डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होत आहोत. माझी विनंती आहे की, गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी स्वत:चं विलगीकरण करावं आणि आपली चाचणी करुन घ्यावी”.
मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. येडियुरप्पा यांनीच ट्विटवरुन यासंदर्भात खुलासा केला आहे. माझी प्रकृती ठीक असून खबरदारीचा उपाय म्हणून मी रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे अशी माहिती येडियुरप्पा यांनी ट्विटवरुन दिली आहे. माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती ठीक आहे. ”डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे मी खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ला क्वारंटाइन करावे अशी मी विनंती करतो,” असं ट्विट येडियुरप्पा यांनी केलं आहे.
स्वतंत्र देव सिंह
उत्तर प्रदेश भाजपाचे प्रदेश अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनाही रविवारी करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यांनी ट्विट करच माहिती दिली आहे.स्वतंत्र देव सिंह यांनी ट्विट करत म्हटले की, ‘लक्षणे दिसल्यानंतर करोनाची चाचणी केली असता माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना निवेदन आहे की नियमांनुसार त्यांनी क्वारंटाइन व्हावं तसेच गरज पडल्यास करोना चाचणी करावी.’
डॉ. महेंद्र सिंह
उत्तर प्रदेश योगी सरकारमधील मंत्री डॉ. महेंद्र सिंह यांचा रविवारी करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
योगेंद्र उपाध्याय
आग्राच्या भाजपा आमदार योगेंद्र उपाध्याय यांना करोना झाल्याचं रविवारी समोर आलं. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. योगेंद्र उपाध्याय यांच्या पत्नी, दोनं मुलं आणि सूनेलाही करोनाची बाधा झाली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”