मनावर दगड ठेवून मी ‘हा’ निर्णय घेत आहे- पंकजा मुंडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी ३ जूनचा परळी दौरा रद्द केला आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त गोपीनाथ गडावर होणाऱ्या कार्यक्रमास त्या उपस्थित राहणार होत्या. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर जाण्याऐवजी घरात राहूनच आपले वडील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करणार आहेत. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांना ही माहिती दिली आहे. ‘मनावर दगड ठेवून हा निर्णय घ्यावा लागत आहे,’ अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

दरवर्षी ३ जून रोजी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी त्यांचे कार्यकर्ते व समर्थक हा दिवस ‘संघर्ष दिन’ म्हणून साजरा करतात. त्या निमित्त गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. मात्र, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा गोपीनाथ गडावर कुठलाही मोठा सोहळा होणार नाही. त्याऐवजी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत छोटासा कार्यक्रम होणार आहे, असं पंकजा यांनीच जाहीर केलं होतं. मात्र, आता पंकजा स्वत: देखील गोपीनाथ गडावरच्या कार्यक्रमाला जाणार नाहीत. पंकजा मुंडे परळीत आल्यास स्थानिक व इतर जिल्ह्यातील लोक मोठ्या संख्येने जमा होतील. त्यामुळे प्रशासनावर मोठा ताण होईल. नियमांचा भंग होईल आणि कोविडचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनानं व्यक्त केली होती. प्रशासनाची ही अडचण लक्षात घेऊन पंकजांनी परळी दौरा रद्द केला आहे.

https://www.facebook.com/PankajaGopinathMunde/posts/3022524674499740

आपला दौरा रद्द करण्या संदर्भात पंकजा यांनी एक सविस्तर पोस्ट फेसबुकवर लिहिली आहे. या पोस्टमध्ये पंकजा लिहितात, ‘ मी एक जबाबदार नागरिक व माजी मंत्री असल्यानं प्रशासनाच्या अडचणी समजू शकते. त्यामुळं ३ जून मुंडे साहेबांचे पुण्यस्मरण घरात राहूनच करेन. प्रीतमताई परळीतच असून त्यादिवशी त्या गोपीनाथ गडावर जातील आणि दर्शन व माझा कार्यक्रम असे दोन्ही ऑनलाईन #Live करतील. सर्व कार्यकर्त्यांनी घरात राहूनच मुंडे साहेबांची पुण्यतिथी साजरी करावी. कशी साजरी करायची याबद्दलचे सर्व डिटेल्स लवकरच देईन आणि आपण सर्व त्याच वेळेमध्ये कार्यक्रम करूया आणि मुंडे साहेबांना समर्पित असा तो दिवस पार पाडूया असं आवाहन त्यांनी आपले  कार्यकर्ते व समर्थकांना केलं आहे.

त्या पुढे लिहितात, ‘मुंडे साहेब आज असते तर त्यांनीही प्रशासनाचा मान राखला असता. दुसऱ्या एखाद्या कारणासाठी संचारबंदी लागली असती तर मी पर्वा केली नसती. पण इथे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळं मनावर दगड ठेवून हा निर्णय घ्यावा लागत आहे. ३ जूनला मी साहेबांचे दर्शन घेऊ शकत नाही हे माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी अतिशय अवघड आहे. मी खूप व्यथित आहे. पण तरीही प्रशासनाला सहकार्य करण्यास तयार आहे, आपणही सहकार्य करावे आणि कोणीही आपापल्या घरातून बाहेर पडू नये, असं आवाहनही पंकजा मुंडेंनी केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment