हसावं कि रडावं! माकडाने पळवले कोरोना रुग्णांचे रक्ताचे नमुने, चावून फोडले देखील 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण बऱ्याचदा काही ठिकाणी माकडांनी लोकांच्या हातातून खाण्याच्या वस्तू हिसकावून नेल्याच्या घटना ऐकल्या आहेत. बघितल्याही आहेत. त्यामुळे माकड दिसले की आपल्या हातातल्या वस्तू लोक लपवून ठेवतात. पूर्वी पाठ्यपुस्तकातील टोपीवाल्याची गोष्ट तर सर्वज्ञात आहे. त्यामुळे माकड कधी काय घेऊन जाईल सांगता येत नाही. आणि कधी कुणासोबत काय होईल हे ही सांगता येत नाही. पण उत्तर प्रतोद मध्ये एका माकडाने चक्क तीन कोरोना रुग्णांचे रक्ताचे नमुनेच हिसकावून पळवून नेले. ते नुसतेच पळवले नाहीत तर चावून फोडल्याची घटना घडली आहे. आधीच हा रोग संसर्गजन्य आहे त्यात तो झपाट्याने वाढतो आहे. त्यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेशातील मेरठ वैद्यकीय महाविद्यालयात एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ विलगीकरण कक्षात ठेवलेल्या तीन कोरोना रुग्णांचे रक्ताचे नमुने परीक्षा नळीतून प्रयोगशाळेकडे निघाला असता, मध्येच माकडांनी हा उच्छाद घातला असल्याची माहिती मिळाली आहे. माकडांनी त्या तंत्रज्ञाच्या हातातून रुग्णांचे रक्ताचे नमुने असणाऱ्या परीक्षा नळ्या हिसकावून घेतल्या आणि धूम ठोकली. मग ते माकड झाडावर जाऊन बसले आणि इतर माकडांसोबत त्या परीक्षा नळ्या दातांनी चावून फोडल्या. याचा एक व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. त्यामुळे लोक घाबरून गेले. मात्र वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस. के. गर्ग यांनी हे नमुने रक्ताचे होते, आणि कोरोनाचा संसर्ग रक्तापासून पसरत नाही. त्यामुळे लोकांनी घाबरू नये असे आवाहन केले आहे. तसेच अदयाप माकडांपासून संसर्ग झाल्याचा काही ठोस आधार मिळाला नसल्याने लोकांनी न घाबरता संयम ठेवावा असेही ते म्हणाले.

दरम्यान, हा इतका निष्काळजीपणा कसा घडला याबाबत चौकशी करण्याचे आदेश पप्रशासनाने दिले आहेत. ज्यांचे रक्ताचे नमुने होते, त्या कोरोनाबाधित रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. रोज तपासणीसाठी त्यांचे रक्त घेतले जाते. या घटनेनंतर त्यांचे पुन्हा रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत.अशी माहिती डॉ गर्ग यांनी दिली. वैद्यकीय महाविद्यालयाने माकडांच्या उच्छादाबद्दल अनेकदा वन विभागाकडे तक्रार दिली आहे. शेकडोच्या संख्येने आलेली माकडांची टोळी दरराेज महाविद्यालयात उच्छाद मांडते आहे. पण वन विभागाने कारवाई केलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.