देशात मोफत लसीकरण सुरू करा ; देशातील सर्वपक्षीय नेत्यांची केंद्राला विनंती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशात काही दिवसांपासून मृत्यूचे प्रमाण देखील वाढलं असून चिंतेत भर पडली आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन संपूर्ण देशभर मोफत लसीकरणासाठी केंद्राला निवेदन दिले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एचडी. देवेगौडा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह देशातील १३ नेत्यांनी केंद्र सरकारकडे तत्काळ मोफत लसीकरण सुरू करण्याची मागणी केली आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी ट्विट करून एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध केलं आहे. या निवदेनात त्यांनी म्हंटल आहे की देशात करोना परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशातील आरोग्य केंद्र आणि सर्व रुग्णालयांना विनाअडथळा ऑक्सिजनचा पुरवठा करण्यावर लक्ष्य केंद्रीत करावं.

त्याचबरोबर केंद्र सरकारने संपूर्ण देशात तत्काळ मोफत लसीकरण कार्यक्रम हाती घ्यावा अशी मागणी विरोधी पक्षांतील नेत्यांनी केली आहे. सर्वसाधारण अर्थसंकल्पात ३५,००० कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. हा निधी करोना लसीकरणासाठी वापरण्यात यावा, असंही नेत्यांनी म्हटलं आहे.

या निवेदनावर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, द्रमुकचे नेते एमके स्टॅलिन, बसपा अध्यक्षा मायावती, फारूक अब्दुल्ला, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, राजदचे नेते तेजस्वी यादव, डी. राजा, सीपीआय(एम)चे नेते सीताराम येचुरी यांची नावे आहेत.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment