हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात ठाकरे सरकार कोसळून भाजप आणि शिंदे गटाने सरकार स्थापन केलं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. त्यानंतर सांख्यिय बलाबळानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची विधानसभा विरोधी पक्षनेते पदी निवड झाली. आता विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच पाहायला मिळेल.
सध्या विधानपरिषद सभागृहात ७८ सदस्य आहेत. यामध्ये शिवसेनेचे सर्वाधिक १३ आमदार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी १० आमदार आहेत. त्यानुसार विरोधी पक्षनेतेपदाची माळ शिवसेनेच्या गळ्यात पडू शकते. आमदारांच्या संख्याबळानुसार विरोधी पक्षनेतेपदावर आमचा हक्क असल्याची भूमिका शिवसेना नेते सचिन अहिर यांनी यापूर्वीच मांडली आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस मात्र जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावासाठी आग्रही असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. एकनाथ खडसे हे अनुभवी आहेत. शिवाय ते आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. भाजप आणि शिंदे गटावर जोरदार प्रहार करण्यासाठी खडसेंसारखा आक्रमक आणि अनुभवी व्यक्ती असावा अशी मागणी राष्ट्रवादी कडून करण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये रस्सीखेच पाहायला मिळेल.
अजित पवार विधानसभेच्या विरोधीपक्षनेते पदी-
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी निवड करण्यात आली आहे. विधानसभेत राष्टवादीकडे सर्वाधिक ५३ आमदार आहेत. त्याखालोखाल काँग्रेस ४४ आणि शिवसेनेकडे १६ आमदार आहेत. त्यामुळे विधानसभेचे विरोधीपक्षनेते पद राष्ट्रवादी कडे गेले. अजित पवार हे आक्रमक नेते आहेत. त्यांना राज्यातील प्रश्नांची जाण आहे. याशिवाय भाजपसारख्या तगड्या पक्षाला धारेवर धरण्यासाठी अजित पवारांसारखा नेताच हवा यामुळे त्यांची वर्णी लागली.




