हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सूचक ट्विट करत अजितदादा हे लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असून राज्यात अजितपर्व सुरु होईल असं म्हणत होते. मिटकरी यांच्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. खरच अजित पवार हे मुख्यमंत्री होऊ शकतात का? याबाबत तर्क वितर्क लावले जाऊ लागत आहेत. त्यातच आता खुद्द सरकार मधीलच एका मंत्र्याने याबाबत मोठं विधान करत अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत ही दिल्लीतील नेत्यांचीही इच्छा असल्याचे सांगून टाकलं आहे. त्यामुळे शिंदे गटाचे टेन्शन वाढण्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाबाबत मोठं विधान केलं आहे. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही फक्त अमोल मिटकरी यांची इच्छा नाही. तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येकाची तशी इच्छा आहे. दिल्लीतील अनेक नेत्यांना सुद्धा अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं. माझीही तीच इच्छा आहे, असं अनिल पाटील यांनी म्हंटल आहे.
परंतु मुख्यमंत्री होण्यासाठी १४५ आमदारांचा आकडा गाठावा लागतो. तो गाठला गेला, तर १०० टक्के अजित पवार मुख्यमंत्री होतील. परंतु आत्ता आमच्याकडे १४५ आमदारांचा आकडा नाही म्हणून आम्ही शिंदे सरकारच्या पाठीशी आहोत असेही अनिल पाटील यांनी म्हंटल. अनिल पाटील यांच्या या विधानानंतर शिंदे गटाची नेमकी भूमिका काय असेल हे आता पाहावं लागेल. कारण एकनाथ शिंदे हेच कायम मुख्यमंत्री राहतील असं शिंदे गटाकडून सातत्याने सांगण्यात येत आहे.