औरंगाबाद – शहरातील बीड रोडवरील निपाणी येथील पेंट्स कंपनीच्या गोदामातून फोनवर संपर्क झालेल्या व्यक्तीवर विश्वास ठेवून 12 लाख 61 हजार 165 रुपये किमतीचे 1 हजार 724 कलरचे डब्बे आयशर गाडीत भरले. हे डबे शहरातील चेलीपुरा भागात देण्यास सांगितले. मात्र अनोळखी व्यक्तीने हमाल तेथे न उतरवता अकोला येथे घेऊन जात फसवणूक केली.
ज्ञानेश्वर सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, निपाणी येथे एशियन पेंट कंपनी गोदाम आहे. त्यातील ट्रांसपोर्टेशनचे काम ज्ञानेश्वर यांच्यासह त्यांचे भाऊ अंबादास पाहतात. ज्ञानेश्वर यांना 12 फेब्रुवारी रोजी एकाने फोनवर गाडी भाड्याने ऑर्डर असल्यास कळवण्यास सांगितले. ज्ञानेश्वर यांनी समाज 13 फेब्रुवारी रोजी परभणीचे भाडे असल्याचे सांगितले. त्यानुसार परभणीतील रंगाचा माल भरून दिला. त्या गाडीच्या चालकाकडे गाडीभाडे फोनवर पाठवून दिले. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच क्रमांकावरून गाडी भाड्याचे विचारपूस झाली. तेव्हा औरंगाबादेतील बाबा ट्रेडर्स चेलीपुरा येथे माल पोहचता करायचे असल्याचे सांगितले. त्यानुसार आयशर (एम एच 20 इएल 0619) गाडी घेऊन दोघेजण आले. त्या गाडीत 1724 कलरचे डबे भरले. त्याची किंमत 12 लाख 61 हजार 165 रुपये होती. हा सर्व माल पोहोचता करण्यासाठी 5 हजार रुपये भाडे ठरले.
माल भरून देताना सोनवणे यांनी कोणतीही विचारपूस केली नाही. दुसऱ्या दिवशी तीन वाजेपर्यंत संबंधितांना माल पोहोचला नाही. त्यामुळे संबंधित मोबाईल वर संपर्क साधला असता एक तासात माल पोहोचता करतो असे सांगून फोन ठेवला. त्यानंतर मोबाईल बंद येऊ लागला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोनवणे यांनी चिकलठाणा पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणात गुन्हा नोंदवण्याची माहिती निरीक्षक देविदास गा त्यांनी दिली. या प्रकरणी अधिक तपास सहायक निरीक्षक शरदचंद्र रोडगे करत आहेत.