हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना आत्मनिर्भर करण्यासाठी २० लाख कोटींच्या भव्यदिव्य पॅकेजची घोषणा केली. हे आर्थिक पॅकेज कुटिरोद्योग, ग्रामीण भारताची व्यवस्था सुधारण्यासाठी आणि भारताच्या विकासासाठी असणार असून हे पॅकेज कष्टकऱ्यांसाठी आहे, देशातील मध्यमवर्गीयांसाठी आहे आणि देशाची औद्योगिक धुरा सांभाळणाऱ्यांसाठी सुद्धा असल्याचं नरेंद्र मोदींनी आज स्पष्ट केलं.
देश पुढं जाण्यासाठी या पॅकेजची आवश्यकता असून संकटकाळात भारताची व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मागील ६ वर्षांच्या एकूण अभ्यासातून हे निर्माण केल्याचं नरेंद्र मोदींनी यावेळी स्पष्ट केलं. जनधन, आधार आणि मोबाईल या त्रिसूत्रीचा अधिकाधिक वापर करुन आपण पुढे जाऊयात असा नारा नरेंद्र मोदींनी यावेळी दिला.
भारतीयांच्या सहनशीलतेचं नरेंद्र मोदींनी कौतुक केलं. त्यांना झालेल्या त्रासाची तीव्र वेदना मलाही आहे. आता मात्र इथून पुढचं प्रत्येक पाऊल हे त्यांना सक्षम करण्यासाठीच टाकायचं यावर नरेंद्र मोदींनी जोर दिला. स्थानिक सुविधांनीच आपल्याला कोरोना संकटाच्या काळात तारलं असून नागरिकांचा लोकल ते ग्लोबल प्रवास आपल्याला याच आत्मनिर्भरतेतून करायचा आहे असं मोदी यावेळी म्हणाले.
लॉकडाऊन ४.० १८ मे पासून
भारतात लॉकडाऊनचा चौथा टप्पा १८ मे पासून सुरु होणार असून यात नवीन सुधारणा केल्या जातील असं नरेंद्र मोदी भाषणाच्या शेवटी म्हणाले. नरेंद्र मोदींच्या आजच्या भाषणाचा पूर्ण रोख हा भारताच्या आत्मनिर्भरतेवर आणि स्वयंपूर्णतेवर असल्याचं पाहायला मिळालं.
”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”