सातारा प्रतिनिधी |सकलेन मुलाणी,
लोकसभा निवडणुकीमुळे जिल्ह्याचे रणांगण चांगलेच तापले आहे. उमेदवारांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघ ढवळून निघाला आहे. सातारा लोकसभेसाठी नऊ उमेदवार नशीब आजमावत आहेत. त्यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू असून या नवरंगी लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.जोरदार प्रचार सुरू असल्याने सातार्याचे रण तापले असून निवडणुकीची उत्सुकता मतदारांमध्ये ताणली आहे. लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच काही इच्छुक गुडघ्याला बाशिंग बसले होते.
बर्याचजणांनी वेगवेगळ्या पक्षांतून चाचपणीही केली. मात्र, पक्षांनी राजकीय अंदाज घेवून उमेदवार्या जाहीर केल्या आणि बरेच बदल झाले. त्यामुळे काही विधानसभा मतदारसंघात निर्माण झालेली दरार कमी करण्याचा प्रयत्न पक्षांनी केल्यावर लोकसभा निवडणुकीने जोर धरला. उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते उमेदवारी अर्जाची छाननी करेपर्यंत कोणकोण निवडणूक लढणार याचे चित्र स्पष्ट नव्हते. माघार प्रक्रिया झाल्यानंतर नऊ उमेदवार निवडणूक लढवणार हे निश्चित झाले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत राजकीय रंग भरु लागले आहेत. महाआघाडीचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सातार्यातून रॅली काढून शक्तिप्रदर्शन घडवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अर्ज भरला आहे.
त्यांनी सुरुवातीपासूनच प्रचारावर जोर धरला. त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघांचा दौरा पूर्ण केला. या दौर्यात त्यांनी संबंधित आमदारांसह स्थानिक नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. रॅली काढून त्यांनी आपले निवडणूक चिन्ह ‘घड्याळ’ मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, रॅली काढून त्यांनी युवा मतदारांना साद घातली. महाविद्यालयांतील युवकांची संवाद साधून त्यांच्या भावना, विचार समजून घेतले. महिला मेळावे घेऊन त्यांनी धरणग्रस्तांशीही संवाद साधला. सध्या आ. शिवेंद्रराजे यांच्यासोबत नगरसेवकांनी एकत्र करुन सातार्यात पदयात्रा सुरु आहेत. उदयनराजे यांच्यासाठी राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले या प्रारंभापासून प्रचारात सक्रीय आहेत. खा. उदयनराजे यांच्यासाठी त्यांच्या पत्नी श्री. छ. सौ. दमयंतीराजे भोसले याही लोकसभेच्या रणांगणात उतरल्या आहेत. दोन्ही राजांचे सैन्य प्रचार करताना दिसत आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रीय काँग्रेस तसेच मित्रपक्षही प्रचारात सहभागी झाले आहेत.
महायुतीचे उमेदवार ना. नरेंद्र पाटील यांनीही सातार्यात पदयात्रा काढून शक्तिप्रदर्शन करत शिवसेनेतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नरेंद्र पाटील यांनी पक्षाचे चिन्ह ‘धनुष्यबाण’ तळागाळतील मतदारांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रयत्न केला आहे. नरेंद्र पाटील हे माथाडींचे नेते आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मुंबईत जावून त्यांनी माथाडी कामगारांची मोट बांधली. त्याठिकाणी मोर्चेबांधणी करुन सातारा लोकसभा मतदारसंघात प्रचारावर जोर धरला आहे. पाटण-कराड विधानसभा मतदारसंघाचे ‘होमपीच’ आणखी बळकट करण्यासाठी त्यांनी व्यूहरचना आखली आहे. पाटील यांनी सहाही विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा झंझावात उभा करुन कडवे आव्हान उभे केले आहे.
दोन दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सातारा, फलटण तसेच दहिवडीत तोफ धडाडणार आहे. उमेदवाराच्या प्रचारासाठी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे स्वत: कराड येथे सभा घेणार असून विरोधकांवर जोरदार हल्ला चढवणार आहेत. राज्यातील दिग्गज नेतेमंडळी जिल्हा दौर्यावर होणार असल्याने सातारा लोकसभा निवडणुकीचा प्रचार ‘हायहोल्टेज’ वळणावर येऊन पोहोचला आहे.