हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे सत्तासंघर्षांवरून राज्यात शिंदे-ठाकरेंमध्ये वाद सुरु असताना असताना दुसरीकडे कर्नाटकात राजकारणात एक खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळे येथील राजकीय वातावरण तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील सत्ताधारी भाजपा आमदारपुत्राला तब्बल 40 लाखांची लाच स्वीकारताना लोकायुक्त पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कर्नाटकमधील चन्नागिरीचे भाजपा आमदार के मडल विरुपक्षप्पा यांचे पुत्र व्ही प्रशांत मडल हे लाच स्वीकारत असल्याची माहिती लोकायुक्त पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी विरूपक्षप्पा यांच्या कार्यालयात धाड टाकली. यावेळी त्यांना प्रशांत लाच स्वीकारत असताना आढळून आला. यावेळी पोलिसांनी त्याला रंगेहाथ अटक केली. तसेच, यानंतर पोलिसांनी प्रशांत यांच्या घरी छापा टाकला. या ठिकाणी छापा टाकल्यानंतर तेथे तब्बल 6 कोटी रुपये आढळून आले.
व्ही प्रशांत मडल हे बंगळुरू पाणी पुरवठा विभागात मुख्य अकाऊंटंट म्हणून काम करतात. ज्या व्यक्तीकडे त्यांनी लाच मागितली होती, त्याच व्यक्तीने प्रशांत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
लाच स्वीकारण्याचं काम आमदारांच्या कार्यालयातून
पोलिसांनी विरुपक्षप्पा यांच्या कार्यालयाची छापा टाकला आणि त्याठिकाणी शोधाशोध केली असता त्या ठिकाणी 1 लाख 20 कोटी रुपये आढळून आले. संबंधित रोख रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली. त्यानंतर प्रशांत यांच्या घरीही पोलिसांनी छापा टाकून तब्बल ६ कोटी रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम जप्त केली. विशेष म्हणजे प्रशांत हे याआधी एसीबीसह आर्थिक सल्लागार म्हणूनही कार्यरत होते.