लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या ठिकाणी नाल्यात एका महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता हा मृतदेह पोलीस कॉन्स्टेबल रुची सिंह हीचा असल्याचे समोर आले. यामुळे संपूर्ण पोलीस दल हादरला आहे. हि हत्या प्रेम प्रकरणातून झाली असल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर आले आहे. पोलीस कॉन्स्टेबल रुची सिंह हिची फेसुबकच्या माध्यमातून एका नायब तहसीलदारांसोबत ओळख झाली होती. यानंतर त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. यामध्ये सर्वात धक्कादायक म्हणजे दोघेही विवाहित आहेत आणि पाच वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. मात्र मृत कॉन्स्टेबल रुची सिंह लग्नासाठी नायब तहसीलदारावर दबाव टाकत होती. त्यातूनच हि हत्या झाली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
काय आहे प्रकरण?
महिला कॉन्स्टेबल रुची सिंह 13 फेब्रुवारीपासून ड्युटीवर आली नव्हती. त्यामुळे तिच्या सहकाऱ्यांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र रुची सिंहचा फोन सतत बंद येत होता. यानंतर तिच्या सहकाऱ्यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला.
नाल्यात आढळून आला मृतदेह
काली माता परिसरातील एका नाल्यामध्ये रुची सिंहचा मृतदेह आढळून आला होता. यानंतर लखनऊच्या पीजीआय पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी सुशांत गोल्फ पोलिस स्टेशनला याची माहिती दिली. यानंतर कॉन्स्टेबल रुचीसोबत काम करणारे सहकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली. यानंतर बिजनौरमधील महिला कॉन्स्टेबलच्या कुटुंबीयांनाही याची माहिती देण्यात आली. लेडी कॉन्स्टेबल रुचीचे लग्न एका कॉन्स्टेबलसोबतच झाले होते. ते सध्या कुशीनगर या ठिकाणी तैनात आहेत.
पाच वर्षांपासून होते रिलेशनशिप
प्रतापगडमधील राणीगंज येथे तैनात असलेल्या नायब तहसीलदाराने फेसबुकच्या माध्यमातून रुचीशी मैत्री केली होती. यानंतर हळूहळू यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. हे दोघेही गेल्या पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. संबंधित नायब तहसीलदारही विवाहित असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र महिला कॉन्स्टेबल त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. पोलीस या प्रकरणी आरोपी नायब तहसीलदाराची चौकशी करत आहेत. या सर्व प्रकरणाचा लवकरच खुलासा होईल असे लखनऊ पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.