स्वातंत्र्य दिन विशेष २०१९| राज्यात भीषण रूप धरणकरून अवतरलेल्या पूरस्थितीमध्ये राज्यातील काही लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशा सर्व गंभीरप्रकारच्या पार्श्वभूमीवर विदेशी महावाणिज्यदूत तसेच अन्य मान्यवरांना स्नेहभोजन आणि स्वातंत्र्यदिनी सायंकाळी आयोजित करण्यात येणारा चहापान कार्यक्रम यावर्षी रद्द केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात निर्णय घेतला आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला विदेशी महावाणिज्यदूत तसेच इतर मान्यवरांना स्नेहभोजन तसेच स्वातंत्र्य दिनी सायंकाळी मुंबई शहरातील मान्यवरांसोबत स्नेहोपहार (चहापान) या दोन कार्यक्रमांचे आयोजन मुख्यमंत्र्यांकडून दरवर्षी केले जाते. मात्र सध्या राज्याच्या काही जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूर परिस्थिती व त्यातून काही निष्पाप व्यक्तींचा झालेला मृत्यू या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी दि. १४ ऑगस्ट २०१९ रोजी आयोजित स्नेहभोजन आणि दिनांक १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी मंत्रालय प्रांगणात आयोजित स्नेहोपहार कार्यक्रम हे दोन्ही कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व निमंत्रितांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या असून नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्वांच्या बहुमोल पाठिंब्याची व सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.