सातारा शहरात महाआरती तर प्रतापगडावर प्रशासाने केली शिवजयंती उत्साहात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
जिल्हा प्रशासनाच्या वतीने किल्ले प्रतापगड (ता. महाबळेश्वर) येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तर राजधानी साताऱ्यात शिवजयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. पोवई नाक्यावर असणाऱ्या शिवतीर्थावर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी शिवतीर्थ येथे येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यानंतर त्यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांची महाआरती पार पडली. या महाआरतीला मोठ्या संख्येने शिवभक्त पोवई नाक्यावर दाखल झाले होते. फटाक्यांच्या आतिषबाजीने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

राजवाडा येथून शिवजयंती निमित्त आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत भव्य अशी शाही मिरवणूक काढण्यात आली. पोवई नाक्यावर असणाऱ्या शिवतीर्थावर रात्री उशिरा श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यानंतर त्यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांची महाआरती पार पडली.

प्रतापगड येथे शिवजयंतीचे औचित्य साधून जय जय महाराष्ट्र माझा हे राज्य गीत अंगिकारण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य प्रेरणादायी असून या कार्याचा तरुण पिढीने आदर्श घेऊन आपली वाटचाल करावी असे, आवाहन जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी केले. प्रत्येक वर्षी येणारा शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे असे सांगून जिल्हाधिकारी श्री जयवंशी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कल्पनेतील देश समाज घडवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहावे. महाराजांनी दिलेल्या विचारांवर चाललो तर कुठल्याही अडचणी येणार नाहीत. त्यांचे कार्य प्रेरणादायी असून त्यांच्या विचारावरच तरुणांनी वाटचाल करावी असे सांगून शिवजयंतीच्या जिल्हा वासियांना शुभेच्छा दिल्या.

पोलीस अधीक्षक समीर शेख म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, गडकोट, किल्ले, लिहिलेले ग्रंथ, त्यांच्या वास्तू, त्यांनी वापरलेले साहित्य याचे जतन केले पाहिजे. महाराजांचे संपूर्ण आयुष्य आपल्यासाठी शिकवण आहे. त्यांचे विचार ठेवून आयुष्याची वाटचाल केली तर कुठलीही दुविधा निर्माण होणार नाही. त्यांचे विचार प्रत्येकाने जपून त्याचा विस्तार केला पाहिजे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पोलीस बँड पथकाने जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगिताची धून वाजवून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने यानिमित्त पोवाडा स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत पारितोषिक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.