महाराष्ट्र: 130 दिवसांनंतर सुरु झालेल्या मॉल्सना पुन्हा लागले कुलूप, संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । महाराष्ट्रात शॉपिंग मॉल उघडण्यासाठीच्या नवीन नियमांमुळे शॉपिंग सेंटर्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि राज्य सरकार समोरासमोर आले आहेत. महाराष्ट्रात राज्य सरकारने मॉल उघडण्यासाठी जारी केलेल्या नवीन नियमांच्या निषेधार्थ, शॉपिंग सेंटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने दोन दिवसांनंतर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व मॉल्स पुन्हा बंद केले आहेत. असोसिएशनचे म्हणणे आहे की,” जोपर्यंत सरकार नियम बदलत नाही तोपर्यंत मॉल बंद राहतील.”

शॉपिंग सेंटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने BMC आणि राज्य सरकारला पत्र लिहून नियमांमध्ये शिथिलतेची मागणी केली आहे. या पत्रात असोसिएशनने म्हटले आहे की,” मॉल्समध्ये काम करणाऱ्या 80 टक्के कर्मचाऱ्यांना ऑगस्टच्या अखेरीस लसीचा दुसरा डोस घ्यावा लागेल, त्यामुळे राज्य सरकारने नियम बदलले पाहिजेत आणि त्यांना पहिल्या डोससह काम करण्याची परवानगी दिली पाहिजे.” मॉलमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांनाही पहिला डोस घेतल्यानंतर मॉलमध्ये येण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही असोसिएशनने केली आहे.

असोसिएशनने अशीही मागणी केली आहे की,” सरकारने त्यांना दीड महिन्यांची मुदत द्यावी जेणेकरून कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देता येईल आणि तोपर्यंत मॉल उघडण्यास परवानगी द्यावी.” असोसिएशनचे म्हणणे आहे की,”2 महिन्यांपूर्वीपासूनच अनेक राज्यांमध्ये मॉल्स खुले झाले आहेत, मग महाराष्ट्रात ते का केले जात नाही ?” असोसिएशनने मॉल बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, जिथे दोन दिवसांपूर्वी गजबज होती, तिथे पुन्हा शांतता झाली आहे आणि सर्व दरवाजे देखील बंद करण्यात आले आहेत. शॉपिंग सेंटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे सीईओ मुकेश कुमार म्हणाले की,”आम्ही यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि BMC आयुक्त यांना पत्र लिहिले आहे, परंतु जोपर्यंत सरकार त्याचे नियम बदलत नाही किंवा शिथिल करत नाही तोपर्यंत मॉल बंदच राहतील.”

खरं तर, 13 ऑगस्ट रोजी BMC ने एक अधिसूचना जारी केली होती ज्याने एक डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांसह मॉल उघडण्याची परवानगी दिली होती, परंतु 16 ऑगस्ट रोजी राज्य सरकारने त्यात बदल करत दोन डोस घेऊन 14 दिवस पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना घेऊनच मॉल उघडण्याचे आदेश जारी केले गेले. या आदेशाच्या निषेधार्थ दोन दिवस मॉल उघडल्यानंतर असोसिएशनने पुन्हा मॉल बंद केले आहेत. आता मॉल असोसिएशनच्या मागण्यांना राज्य सरकार किती गांभीर्याने घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, कारण 6 एप्रिल 2021 रोजी 130 दिवस बंद झाल्यानंतर 15 ऑगस्टपासून मॉल पुन्हा सुरू होऊ लागले, मात्र दोनच दिवसांनी ते पुन्हा बंद झाले आहेत.