तळीराम पावले! ३ दिवसांत १०० कोटींहून अधिक महसूल गोळा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । केंद्र सरकारने ४ मेपासून कन्टेंन्मेंट झोन वगळता इतर भागात अटी-शर्तींसह दारु विक्री करण्यास परवानगी देण्यात आली. महाराष्ट्रातही दारुची दुकाने पुन्हा सुरु करण्यास परवानगी मिळाल्यानंतर वाईन शॉप्सच्या बाहेर तळीरामांची एकच झुंबड उडाली. गेल्या दीड महिन्यापासून दारूविना तडफडत असलेल्या तळीरामांनी लांब रांगेत उभे राहून अधाशी वृत्तीने आपला दारूचा कोटा ‘फुल’ करायला सुरुवात केली. तळीरामांच्या या दारूवेडामुळे राज्यातील दारू विक्रीच्या आकड्यांनी उचांक गाठला आहे. त्यामुळं राज्याच्या तिजोरीत या तळीरामांनी मोठं आर्थिक योगदान दिल्याची माहिती आता समोर आली आहे.

मागील ३ दिवसांत १०० कोटी रुपयांहून अधिक महसूल दारूविक्रीच्या माध्यमातून मिळवला असल्याचं उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बुधवारी सांगितलं. राज्यातील एकूण दारु दुकानांपैकी केवळ एक तृतीयांश दारुची दुकानं सुरु होती. त्यातून उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी रात्रीपर्यंत १०० कोटींपेक्षा जास्त महसूल मिळवला असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्रात दारु, आयएमएफएल, वाइन आणि बिअरची विक्री करणारी १००० हून अधिक परवानाधारक दुकानं असून त्यापैकी केवळ २९६७ दुकानं बुधवारी सुरु असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

मंगळवारी जवळपास १६.१० लाख लिटर आयएमएफएल (इंडियन मेड फॉरेन लिकर), बिअर, वाइन आणि देशी दारुची विक्री झाली. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत महापालिका आयुक्तांनी दारुची विक्री स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही हा कल कायम असल्याचं सांगण्यात आलं आहे. . सोमवारपासून दारुची दुकानं सुरु झाल्यानंतर मद्यपींच्या दारु दुकानांबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. यावेळी ग्राहाकांकडून कोणत्याही नियमांचं, सोशल डिस्टंन्सिंगचं पालन होत नसल्याचं चित्र होतं. ग्राहकांची गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला होता. मात्र, मंगळवारच्या तुलनेत बुधवारी पोलिसांनी लाठीचार्ज करण्याच्या किंवा ग्राहकांनी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन केल्याच्या घटना कमी झाल्याचं एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”