हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पोट निवडणुकीमुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले होते. त्यानंतर आता राज्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर झाली आहे. येत्या 27 फेब्रुवारीपासून विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन 25 मार्चपर्यंत हे अधिवेशन असणार आहे. 9 मार्चला अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प मांडणार आहेत. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळे या नवीन अर्थसंकल्पात नेमक्या काय घोषणा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात 9 मार्चला दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. तत्पूर्वी म्हणजे 8 मार्च रोजी महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल मांडला जाणार आहे. शिंदे गट आणि भाजपसाठी हा अर्थसंकल्प महत्वाचा असणार आहे. कारण सत्तेत आल्यानंतर सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प आहे. यावर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात काही महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. याशिवाय कृषी, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, सिंचन, ऊर्जा आदी विभागांना अर्थसंकल्पात झुकते माप मिळणार हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे.