कॉंग्रेस हाय कमांड : जेष्ठ नेत्यांनी विधानसभेची निवडणूक लढा ; या नेत्यांना लढण्याचे आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्या नंतर काँग्रेसने आता विधानसभा निवडणुकीला नवीन रणनीती आखली आहे. काँग्रेसच्या महाराष्ट्रातील सर्वच जेष्ठ नेत्यांना काँग्रेसने विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचे आदेश दिले आहेत. जेष्ठ नेते निवडणुकीला सामोरे गेल्यास काँग्रेसचे संख्याबळ वाढेल आसा काँग्रेस पक्ष श्रेष्ठींचा अंदाज आहे.

उद्या बुधवारी काँग्रेस छाननी समितीची नवी दिल्लीत महत्वाची बैठक पार पडणार आहे. त्या बैठकीत काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांनी विधानसभा निवडणूक लढण्याच्या दृष्टीने रणनीती अंतिम करण्यात येणार आहे. त्यामुळे भाजपच्या दिग्विजयाचा सामना करण्यासाठी कोणकोणते नेते मैदानात उतरणार हे येत्या काळात बघायला मिळणार आहे.

अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, संजय निरुपम, मिलिंद देवरा आणि राजीव सातव या नेत्यांना विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी काँग्रेसने सांगितले असून त्यांची मते पक्ष उद्याच्या बैठकीत जाणून घेण्याची शक्यता आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी याआधीच आपण कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उभा राहणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच अशोक चव्हाण देखील त्यांच्या पत्नी आमदार असणाऱ्या भोकर या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. अन्य नेते कोणते मतदारसंघ निवडणार हे देखील पाहण्यासारखे राहणार आहे.