केंद्रानं संसदेचं अधिवेशन रद्द केल्याने, राज्यातील भाजप नेत्यांवर तोंडावर आपटण्याची वेळ; ‘हे’ आहे कारण

मुंबई । कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द (Parliament Winter Session) करण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारनं घेतला आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली आहे. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कालावधीवरून ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांची केंद्राच्या या निर्णयामुळं पुरती पंचाईत झाली आहे.

राज्य विधिमंडळाचं दोन दिवसांचं अधिवेशन सध्या सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाचा कालावधी कमी करून दोन दिवसांचा करण्यात आला. त्यावरून राज्यातील विरोधी पक्ष भाजपनं सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राज्य सरकार प्रश्नांपासून पळ काढतंय, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Dvendra Fadanvis) व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या समस्या, वाढीव वीज बिल, शक्ती कायदा व पुरवणी मागण्यांवर चर्चा करायला सरकार तयार नाही, अशी टीका विरोधकांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकार हे आठवे आश्चर्यच आहे, असा टोलाही भाजप नेत्यांनी हाणला होता. (winter session of maharashtra legislature)

मात्र, केंद्रातील मोदी सरकारनं संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द केल्याने राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना भाजपचे नाक दाबण्याची आयती संधी मिळाली आहे. संसद अधिवेशन रद्द झाल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी भाजपला घेरलं आहे. ‘राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी कमी आहे अशी बोंब ठोकत महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला आठवे आश्चर्य म्हणणारा भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात दांभिक आणि ढोंगी पक्ष आहे. मोदी सरकारनं कोविडमुळं संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्दच केलं. आता मोदींना कितवे आश्चर्य म्हणणार?,’ असा बोचरा सवाल सावंत यांनी केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’