‘देश जळतोय अन् ‘आधुनिक निरो’ प्रचारात मग्न’; काँग्रेसच्या ‘या’ नेत्यांचा मोदींवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान कार्यालयाला फोन करून राज्याला ऑक्सिजन आणि रेमेडेसिव्हीरचा पुरवठा करण्याची मागणी केली. परंतु पंतप्रधान पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत, असे कळवण्यात आले. यातूनच हे आधुनिक निरो देश जळत असताना निवडणूक प्रचारात मग्न आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर केली आहे.

काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट करताना सावंत म्हणाले की, कोरोनाच्या संकटाचा मोदी सरकार राजकीय संधी म्हणून वापर करत आहे. मानवतेच्या समोर असलेल्या या संकटामध्ये केंद्र आणि राज्य सरकारांनी मिळून एकत्रितपणे मुकाबला करणे अपेक्षित असताना मोदी सरकार मात्र महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारची बदनामी कशी होईल यासाठी केंद्रातील मंत्री ट्रोलच्या भूमिकेत शिरले आहेत, असा आरोपसुद्धा सावंत यांनी केला आहे.

महाराष्ट्राला वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात केला जात नाही. यासोबतच लस आणि ऑक्सीजनच्या पुरवठ्यातही महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिली जात आहे. आता तर महाराष्ट्राला रेमेडेसिव्हीर इंजेक्शनही मिळू नये म्हणून केंद्र सरकार रेमेडेसिव्हीर उत्पादक कंपन्यांवर दबाव टाकत आहे. यापेक्षा अमानवीय कोणतेही सरकार असू शकत नाही, असेसुद्धा सावंत यांनी म्हटले आहे. सोबतच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या प्रकाराचा जाहीर निषेध करत असल्याचेसुद्धा सावंत यांनी सांगितले आहे.

You might also like