नवी दिल्ली । महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर नाना पटोले यांनी आज दिल्लीत पहिल्यांदाच सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी नाना पटोले यांनी राहुल गांधींची भेट घेऊन राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. महाराष्ट्रात काँग्रेसचं संघटन अधिक मजबूत कसं करता येईल, येणाऱ्या काळात कोणते धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील, यासंबंधीची चर्चा झाल्याची माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले यांनी दिली. तसंच मोदी प्रचाराला आले पण हरलो नाही, आता काँग्रेसला नंबर 1 करणार, असा निर्धार नाना पटोले यांनी केला.
याशिवाय दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरही पटोले यांनी यावेळी भाष्य केलं. “दिल्लीत शेतकऱ्यांचं अनेक दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. खरंतर केंद्र शासनाने आतापर्यंत त्यांचं म्हणणं ऐकून तोडगा काढायला हवा होता. परंतु तोडगा काढण्याऐवजी देशाचे पंतप्रधान शेतकऱ्यांना हिणवत आहेत. हे देशाच्या दृष्टीने नक्कीच भूषणावह बाब नाही”, अशी टीका नाना पटोले यांनी केली. ”मोदींनी काहीही बोललं तरी तो कायदा होतो पण दुसऱ्याने काही बोललं तर तो राष्ट्रद्रोह होतो. इंग्रज आणि मुघलांनी जेवढे अत्याचार केले नाहीत तेवढे अत्याचार आताचं विद्यमान सरकार शेतकऱ्यांवर करत आहेत”, अशी टीकाही पटोले यांनी केली.
नाना पटोले यांना मंत्रिपद मिळणार का?
नाना पटोले आणि नितीन राऊत एकाच वेळी काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या भेटीला गेले आहेत. राजधानी दिल्लीत झालेल्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मंत्रिपदाबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, अशी सूचक प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली आहे. त्यामुळे नाना पटोलेंना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नितीन राऊत यांच्याकडे असलेलं ऊर्जा खातं नाना पटोलेंकडे जाण्याची चिन्हं आहेत.
मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.