‘कोरोनाची लस कधी येणार माहिती नाही, पण…’आरोग्यमंत्री राजेश टोपेंची मोठी माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लस निर्मितीचा आढावा घेतला आहे. ती लस कधी येणार ते माहिती नाही. पण लस आली तर तिचं योग्य नियोजन सरकार करत आहे. कोल्ड स्टोरेज वाढवणं, त्याची साठवण क्षमता यावर सरकारची तयारी सुरु आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. केंद्र सरकारनं दिलेल्या सूचनांप्रमाणे सर्व खबरदारी घेतली जात असल्याचं टोपे म्हणाले.

कोरोनाची लस आल्यानंतर प्रथम श्रेणीत ती लोकप्रतिनिधींना देण्यात यावी, अशी मागणी झाल्याची चर्चा सध्या सुरु आहे. त्यावर, अशी कुठलीही मागणी झालेली नाही. लस आल्यानंतर ती पहिल्यांदा डॉक्टर आणि पोलिस कर्मचाऱ्यांनाच देण्यात येईल, असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. कोरोना लस कुणाला द्यावी, त्याचं वर्गिकरण कसं व्हावं याचं संपूर्ण नियंत्रण केंद्र आणि राज्य सरकारकडे आहे. प्रोटोकॉलनुसारच लस देण्यासंदर्भात विचार केला जाईल, असं टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

दरम्यान, भारतात अहमदाबाद, हैदराबाद आणि पुण्यात कोरोना लसीची निर्मिती सुरु आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून निर्माण केली जाणारी लस अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. या लसीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर आले होते. अहमदाबादमधील झायडस कॅडिला, हैदराबादेतील भारत बायोटेक आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये निर्मिती केली जाणाऱ्या लसीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. ऑक्सफर्ड विद्यापीठ, अॅस्ट्रा झेनेका आणि सीरम इन्स्टिट्यूटद्वारे संयुक्तरित्या कोरोना लसीची निर्मिती सुरु आहे. तर लसीच्या वितरणाबाबत केंद्र सरकारनं आतापासूनच मोठी तयारी सुरु केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’