मुंबई । महाराष्ट्रात आज दिवसभरात ६,६०३ नवे रुग्ण आढळून आले आहेत तर राज्यातील १९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण रुग्णसंख्या आज २ लाख २३ हजार ७२४ इतकी झाली आहे. तर राज्यातील रमुन मृतांची संख्या ९ हजार ४४८ झाली आहे. राज्यसरकारने आज संचारबंदीच्या शिथिल केलेल्या नियमांमध्ये सुरु करण्यात आलेल्या दुकानांच्या वेळेत २ तासांची वाढ केली आहे. आजपासून दुकाने ९ ते ५ न राहता सकाळी ९ ते सायंकाळी ७ झाली आहे. पुण्याचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी राज्यसरकारच्या या निर्णयामुळे जनतेत समाधानाचे वातावरण असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान मुंबई महानगर क्षेत्रातील पुण्यासह सोलापूर, औरंगाबाद आणि नाशिक इथेही मिशन बिगिन २ अंतर्गत ही वेळ करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यातील विविध भागांचा दौरा करत आहेत. आज नाशिक येथे त्यांनी चाचण्यांचा वेग वाढविला पाहिजे असे म्हंटले आहे. आयसीएमआर ने सांगितल्यानुसार लक्षणे असणाऱ्या आणि नसणऱ्या सर्वांच्या चाचण्या घेणे तसेच त्यांचे अहवाल २४ तासांच्या आत येणे गरजेचे आहे असे म्हणाले आहेत. दरम्यान आज औरंगाबाद येथे आज शिवसेनेच्या नितीन साळवे आणि रावसाहेब आमले या दोन नगरसेवकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १ ते ४ जुलै दरम्यान दौऱ्यावर असताना संपर्कात आलेल्या दोन राजकीय नेत्यांना कोरोना झाल्याने शिरूरचे आमदार अमोल कोल्हे यांनी केलेली कोरोना चाचणी नकारात्मक आली असली तरी त्यांनी स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतले आहे.
राज्यातील सर्वाधिक रुग्ण आढळून आलेल्या मुंबईमध्ये कोरोनाच्या उपचारासाठी तात्पुरती रुग्णालये तयार करण्यात आली आहेत. पुरेसा ऑक्सिजन आणि आयसीयू असूनही तज्ञांच्या अभावी लोकर्पणानंतरही रुग्णालये सुरु झाली नाही आहेत. लवकरच ही रुग्णालये सुरु होतील असे सांगण्यात आले आहे. दरम्यान देशातील रुग्णसंख्या ७ लाख पार झाली असून जगाने १ कोटी ११ लाखांच्याही पुढे रुग्णसंख्येचा पल्ला गाठला आहे. भारत आता रुग्णसंख्येच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर येऊन पोहोचला आहे.