विशेष प्रतिनिधी । दिवाळी आली की कर्मचाऱ्यांना वेध लागतात ते दिवाळी बोनसचे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या ४ वर्षाप्रमाणेच याही वर्षी सरकारनं महामंडळाच्या १ लाख कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा केली आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही घोषणा केली. गेली ४ वर्षे एस.टी महामंडळातील सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्यात येते. यापूर्वी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त १० हजार बोनस देण्यात आला होता. एस.टी. महामंडळात कार्यरत असणाऱ्या सुमारे १ लाख १० हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी निमित्त २,५०० व ५,००० इतकी रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्यात येणार आहे. आचारसंहिता अद्यापही सुरू असल्याने याबाबतचा प्रस्ताव निवडणूक आयोगाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. निवडणूक आयोगाची परवानगी मिळताच कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्यात येईल, अशी घोषणा दिवाकर रावते यांनी केली.
केंद्र व राज्यशासनाप्रमाणे ३ टक्के महागाई भत्ता १ जानेवारी २०१९ पासून देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यापैकी ऑक्टोबरच्या वेतनामध्ये ३ टक्के महागाई भत्ता देण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळीही एस.टी कर्मचाऱ्यांना आनंदाची होणार आहे. दिवाळीच्या सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी विचारात घेऊन एस.टी. महामंडळातर्फे २४ ऑक्टोंबर ते ०५ नोव्हेंबर या कालावधीत विविध विभागातून सुमारे ३,५०० बसेस सोडण्यात येणार आहेत. या लांब पल्ल्याच्या जादा वाहतूकीबरोबरच स्थानिक स्तरावर आवश्यकतेनुसार जादा बसेस सोडण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.