‘इंडिया’च्या डिनरमध्ये ‘मराठमोळा खानपान’; पुरणपोळी, झुणका भाकरीवर नेते मारणार ताव

india aghadi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंडिया आघाडीची पुढील बैठक येत्या 31 ऑगस्ट रोजी मुंबईत पार पडणार आहे. या बैठकीला आघाडीमधील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहतील. खास म्हणजे, या बैठकीतील सर्व नेत्यांचे स्वागत महाराष्ट्रीयन पद्धतीने करण्यात येईल. तसेच बैठकीनंतरच्या जेवणाचा मेनू देखील महाराष्ट्रीयन असेल. यामुळे विविध राज्यातून येणाऱ्या नेते मंडळींना महाराष्ट्रातील संस्कृती जाणून आणि समजून घेता येईल. या बैठकीचे सर्व नियोजन महाविकास आघाडी कडून करण्यात आले आहे.

इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी विविध राज्यातून नेते आल्यानंतर त्यांचे स्वागत ढोल ताशाच्या गजरात करण्यात येईल. तर त्यांच्या खानपानात देखील महाराष्ट्रीयन पद्धतीचे जेवण वाढले जाईल. मराठी संस्कृतीची ओळख घडवण्यासाठी इंडिया आघाडीच्या बैठकीचा डिनर मेनू पुरणपोळी, झणझणीत झुणका-भाकर, वडा-पाव असा ठेवण्यात आला आहे. बाहेरील राज्यातील नेत्यांना महाराष्ट्रीयन पदार्थांची चव कळावी यासाठी हा मेनू ठेवण्यात आला आहे.

31 ऑगस्ट रोजी होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला विविध राज्यातून ६० ते ६५ नेते उपस्थित राहणार आहेत. या सर्व नेत्यांसाठी पंचतारांकित हॉटेलमधील १७५ खोल्या बुक केल्या जाणार आहेत. या बैठकीमध्ये आगामी निवडणुकांसाठीची महत्वाची सूत्रे ठरवण्यात येतील. त्यामुळे मुंबईत पार पडणारी ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या सर्व बैठकीचे आयोजन महाविकास आघाडी करणार आहे. त्यामुळे बैठकीनंतरच्या डिनरचा मेनू देखील त्यांच्याकडून ठरविण्यात आला आहे.

दरम्यान, इंडिया आघाडीची सर्वात पहिली बैठक २३ जून रोजी बिहारच्या पाटणा येथे पार पडली होती. तर दुसरी बैठक १८ जुलै रोजी कर्नाटकच्या बंगळुरू शहरात झाली होती. आता या तिसऱ्या बैठकीचे आयोजन येत्या 30 ऑगस्ट रोजी मुंबईत करण्यात आले आहे. या बैठकीसाठी महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू आहे. या खास बैठकीसाठी पाच नेत्यांचं एक पथक तयार करण्यात आलं असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.