हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. फडणवीसांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांच्या जिवाला धोका असल्याचा अहवाल मुंबई पोलिसांनी दिल्यानंतरसुद्धा त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड यांना विशेष सुरक्षा यापुढे नसणार आहे. मध्यंतरीच्या काळात देवेंद्र फडणवीस नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याची चर्चा होती. त्यामुळे त्यांच्या निकटवर्तीयांना चिंता लागली होती. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्यांच्या कारकिर्दीत अनेक नक्षलवादीविरोधी निर्णय घेतल्याने त्यांच्या जीवाला धोका कायम असल्याचं बोललं जात आहे.रात्री उशीरा फडणवीसांना असणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेतून पायलट वाहन आणि बुलेटप्रुफ गाडी काढून घेण्यात आली.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप आमदार प्रसाद लाड तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही सुरक्षा व्यवस्थेत मोठी कपात केली आहे. राज ठाकरे यांना झेड (z) दर्जाची सुरक्षा होती. ती काढून त्यांना आता वाय प्लस (y+) सुरक्षा देण्यात येईल.
मुंबई पोलिसांनी फडणवीसांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल दिल्यांनतर त्यांच्या सुरक्षेत कपात न करण्याची शिफारस करण्यात आली होती. राज्याचे माजी पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांनीसुद्धा फडणवीसांच्या सुरक्षा कपातीला विरोध केला होता. मात्र, जैस्वाल यांची बदली होताच सुरक्षा कपातीचा हा निर्णय घेतला गेला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’