खोटं न बोलता गांधी वकील झालेच कसे? जाणून घ्या

images
images
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

महात्मा गांधी जयंती विशेष | स्नेहल जाधव

अनेकदा आपण लोकांकडून ऐकतो की ‘गांधी एक यशस्वी वकील कधीच बनू शकले नाहीत’. मग प्रश्न असा की खरंच गांधी यशस्वी वकील बनण्यास अपयशी ठरले का? की त्यांनी “वकील” या शब्दाची परिभाषा बदलून खऱ्या अर्थाने एक वकील कसा असावा याची आदर्श संकल्पना समाजासमोर मांडली? गांधींच्या १५० व्या जयंती निमित्त त्यांच्यातला एक ‘आदर्श वकील’ जाणून घेऊयात.

वकिलीच्या धंद्यात खोटे बोलल्याशिवाय चालायचेच नाही असे गांधीजींनी विद्यार्थीदशेत असतानाच ऐकलं होतं. पण त्यांना खोटं बोलून प्रतिष्ठाही मिळवायची नव्हती आणि धनही कमवायचे नव्हते. त्यांचं ठाम मत होतं की खरा वकील तोच असतो जो सत्य आणि सेवेला सर्वात प्रथम प्राधान्य देतो आणि त्यानंतर वकिलीकडे व्यवसाय म्हणुन पाहतो. ‘जेव्हा न्यायीपणाने आपल्याला आपली बाजू लायक आणि भक्कम वाटत असेल तेव्हाच न्याय मिळेल’ असं गांधींना वाटे. दादा अब्दुल्ला च्या खटल्यामध्ये त्यांना समजलं की वकील या नात्याने दोघांच्याही वकिलांचे काम म्हणजे दुसऱ्यावर मात करण्यासाठी कायद्यात सापडतील तेवढ्या फटी शोधून काढण्याचे. तेव्हाच त्यांच्या हेही लक्षात आलं की प्रत्येक दाव्यात हकीकतीला खूप महत्व आहे हकीकत म्हणजे खरी गोष्ट. खऱ्याला चिकटून राहिल्यास कायदे आपण होऊनच आपल्याला अनुकूल अशी जुळवाजुळव करून घेतात.

वकिली करीत असतेवेळी गांधीजींनी असाही आणखी एक प्रघात पाडला की ते त्यांचे अज्ञान अशिलापासून किंवा विरोधी वकीलापासूनही लपवित नसत. जेथे त्यांची मती चालेनाशी होई तेथे ते अशिलांना इतर वकीलाकडे जायला सांगत असत किंवा स्वतः अधिक अनुभवी वकिलाचा सल्ला घेऊन काम चालवत असत. या प्रांजळपणामुळे ते अशिलांचे अगाध प्रेम व विश्वास संपादू शकले. वकिली करत असताना मनुष्याची चांगली बाजू शोधून काढायला आणि त्याचबरोबर मनुष्याच्या हृदयात प्रवेश करण्याची कला गांधीजी शिकले. महत्वाचे म्हणजे या विश्वासाचा व प्रेमाचा सार्वजनिक कार्यामध्ये त्यांना परिपूर्ण उपयोग झाला.

अलौकिक बुद्धीने दोन्ही पक्षांचा मिलाप घडवून आणणं हे वकिलाचं मुख्य कर्तव्य आहे. (The true function of a lawyer was to unite parties riven asunder) असं त्यांनी मानलं. म्हणजेच वकिलांचे कर्तव्य पक्षकारांमध्ये पडलेली फूट भरून काढण्याचे आहे. म्हणून त्यांचा वीस वर्षांतील वकिलीचा बराचसा वेळ स्वतःच्या ऑफिसात बसून शेकडो दाव्यांच्या तडजोडी करविण्यातच गेला. तिथे ते म्हणतात की ‘यामध्ये माझं काहीच नुकसान झालं नाही’ “I lost nothing thereby not even money; certainly not my soul.”

गांधीजींची आणखी एक आवर्जून सांगावी अशी गोष्ट म्हणजे दक्षिण आफ्रिकेमध्ये प्रेसिडेंट स्ट्रीटवर शिपायाने जेव्हा मोहनदास गांधींना धक्का देऊन, लाथ मारून रस्त्यावरून काढले तेव्हा या प्रसंगी “मला व्यक्तिशः सहन कराव्या लागणाऱ्या क्लेशासाठी कोर्टात जायचे नाही, फिर्याद करायची नाही” असा नियमच त्यांनी केला. म्हणजे तेव्हाच त्यांनी स्वतःला समाजासाठी अर्पण केलं होतं.

शेवटी मला समजलेला गांधीजीं मधला वकील म्हणजे “चार भिंतीत वकिली न करता समाजात जाऊन लोकांवरचा अन्याय जाणून/समजून घेऊन अन्याय दूर करणारा एक सच्चा वकील”. त्यामुळे आजच्या घडीला जर गांधीजींच्या पावलावर पाऊल ठेऊन वकील चालले तर न्याय व सामान्य माणूस यात ‘भ्रष्टाचार’ नावाची जी दरी निर्माण झाली आहे ती कमी होण्यास नक्कीच मदत होईल!

Snehal Patil

स्नेहल जाधव, कराड

[email protected]

(लेखिका कायद्याच्या विद्यार्थीनी असून भारती विद्यापिठ,कराड येथे शिक्षण घेत आहेत)