स्वातंत्र्यदिन विशेष | मयुर डुमने
महात्मा गांधीजींच वर्णन एका शब्दात कर असा प्रश्न कोणी मला विचारल्यास मी गांधीजींचा उल्लेख “व्यक्तिचुंबक” असा करेन. लोहचुंबक जसा लोखंडाला स्वतःकडे खेचतो तसं गांधीजींनी वेगवेगळ्या व्यक्तींना आपल्याकडे खेचून आणलं. नेमकी काय जादू होती या व्यक्तिमत्वात ? गांधीजींचा शोध घेण्याचा माझा छोटासा प्रयत्न
दक्षिण आफ्रिकेतून भारतात आल्यावर गांधीजींनी लगेच स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतला नाही. नामदार गोपाळकृष्ण गोखल्यांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे त्यांनी रेल्वेच्या तिसऱ्या वर्गातील डब्यातून प्रवास करत भारतीय समाजाच्या समस्या समजावून घेतल्या.भारतातील सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती समजावून घेऊनच गांधीजी स्वातंत्र्य लढ्यात उतरले.
१९१६ च्या लखनौ काँग्रेस अधिवेशनात राजकुमार शुक्ल नावाचा व्यक्ती चंपारण्यातील शेतकऱ्यांवरील अन्यायाच्या वेदना सांगत होती, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अधिवेशनात प्रस्ताव मांडण्याची विनंती करत होती पण कोणीच त्यांचे म्हणणे ऐकायला तयार नव्हते. अशावेळी महात्मा गांधीजींनी त्याची समस्या समजावून घेतली आणि चंपारण्यला येण्याचे आश्वासन दिले. पुढे गांधीजींनी चंपारण्यात निळ उत्पादनाची सक्ती करणाऱ्या सरकारविरुद्ध सत्याग्रह करून गरीब शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला.
१९१८ चा अहमदाबादचा गिरणी कामगार लढा गांधींमुळे यशस्वी झाला या लढ्यांमुळे खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यलढ्याची चळवळ शेतकरी आणि कामगार वर्गापर्यंत पोहचली.जी गोष्ट काँग्रेस मधील अनेक महनीय व्यक्तींना करता आली नाही ती गांधींनी करून दाखवली. ही चळवळ चालू असतानाच गांधीजींनी रचनात्मक कार्यावर भर दिला. अन्न आणि वस्त्र या मूलभूत गरजा सर्वांना मिळत नव्हत्या, त्यासाठी गांधीजींनी भारतीय जनतेला चरखा हाती घ्यायला लावला. हळूहळू चरख्यावर सूत कातून हातमागावर कापड विणण्याचा उद्योग खेडोपाडी पसरत गेला. खादीचे कापड या उद्योगातून मोठया प्रमाणावर निर्माण झाले. महिलांसह सर्वांनाच रोजगाराची संधी उपलब्ध झाली. गांधीबाबाच्या या खादीनिर्माण कार्यक्रमामुळे पाहता पाहता इंग्लडमधील लँकेशायर व मँचेस्टरमधील कापडाच्या गिरण्या बंद पडत चालल्या होत्या. परकीय कापडाच्या मालावर बहिष्कार टाकून जे साध्य होऊ शकलं नाही ते गांधींच्या चरखा खादी कार्यक्रमामुळे साध्य झालं.
“शांतीत क्रांती” कशी करायची हे या गांधीबाबाकडून शिकावं. महात्मा गांधी म्हणतात “देशातली सात लाख खेडी हा भारताचा आत्मा आहे. ही खेडी स्वावलंबी व स्वयंपूर्ण झाल्याशिवाय खर स्वराज्य अवतरणार नाही.” गांधी पुढे म्हणतात “देशाच्या भविष्य निर्मितीत माझाही अल्पसा वाटा आहे असं ज्यावेळी गरीबातल्या गरीब व्यक्तीला वाटेल त्यावेळी स्वराज्य आलं अस मी समजेन” स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं म्हणणाऱ्या टिळकांपेक्षा महात्मा गांधींना स्वराज्य म्हणजे काय हे चांगलं कळालं होत अस मला तरी वाटतं. देशप्रेम, स्वावलंबन, बंधुत्व, रोजगार,श्रमप्रतिष्ठा, महिलांचा सहभाग, लोकांमधील आत्मविश्वास असे अनेक उद्देश गांधींच्या या चरखा खादीच्या कार्यक्रमामुळे साध्य झाले. गांधींची चळवळ ही केवळ स्वातंत्र्यासाठी लढणारी चळवळ नव्हती तर परिवर्तनाची सकारात्मक चळवळ होती. रचनात्मक कार्य हा गांधींच्या चळवळीचा पाया होता. जगात अनेक प्रकारची क्रांती झाली परंतु देशाच्या उज्वल भविष्यासाठी समाज कसा असावा? याचा विचार फार थोड्या लोकांनी केला त्यात महात्मा गांधी होते.
गांधीजींची अहिंसा –
गांधीजींच्या अहिंसा या तत्वाबाबत बरेच गैरसमज आहेत.त्यामुळे मला येथे एक प्रसंग सांगावासा वाटतो गांधींच्या वर्ध्याच्या आश्रमात एक माकड सर्वांवर हल्ला करत होते तेव्हा गांधीजींच्या शिष्यांनी त्यांना विचारले की या माकडाचे करायचे काय ? गांधीजी म्हणाले, या माकडाला मारून टाका म्हणजेच हिंसा करा शिष्यांचा प्रतिप्रश्न – आपण तर अहिंसावादी आहोत हिंसा कशी करणार ? त्यावेळी गांधीजींचं उत्तर आहे “स्वतःच अस्तित्व सोडून दुसऱ्या व्यक्तीचे अस्तित्व संपुष्टात आणणाऱ्या प्राणी व माणसाची हत्या करणे म्हणजे हिंसा नव्हे. जगण्याचा अधिकार हिरावून घेणारी कोणतीही व्यक्ती स्वतःच्या जीवन जगण्याच्या अधिकारापासून दूर गेलेली असेल तिला जगण्याचा अधिकार नाही” गांधीजींची अहिंसा ही दुर्बलाची (पळपुटी) अहिंसा नव्हती तर सबलाची अहिंसा होती. अजून एक प्रसंग मला सांगावासा वाटतो गांधीजी रेल्वे ने प्रवास करताना रेल्वे च्या तिसऱ्या वर्गाच्या डब्यातून प्रवास करत असत. एकदा गांधींजी या डब्यात चढले आणि जागेचा शोध घेऊ लागले. एका जवानाने गांधींना पाहून बाकड्यावरची सर्व जागा एकट्यानेच अडवून धरली. गांधीजी बाकड्यावर न बसता त्याच्या पायाजवळ बसले त्यामुळे जवान खजील झाला आणि त्याने गांधीजींना बाकड्यावर बसायला जागा दिली. अशाप्रकारे अहिंसक मार्गाने माणसातला विवेक जागा करून मनपरिवर्तन घडवणे हे गांधीजींचं तंत्र होय. आइन्स्टाइन, नेल्सन मंडेला, बराक ओबामा यांसारख्या अनेक व्यक्तींना गांधी नावाच्या चुंबकाने कसे प्रभावित केले असेल? जानेवारी १९१५ मध्ये गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले. १९१९ मधील नागपूर काँग्रेसनंतर गांधींचं राष्ट्रीय नेतृत्व सर्वांनी मान्य केलं. अवघ्या पाच वर्षात गांधींनी लाखोंची मन जिंकली. हे घडलं कस? हा प्रश्न पडतो. मला याच मुख्य कारण गांधीजीच्या व्यक्तिमत्वात सापडत. हा माणूस जसा बोलतो तसाच वागतो म्हणजेच बोले तैसा चाले. आचार आणि विचारात फरक नसणे ह्या वृत्तीमुळेच गांधींना लोकांचा विश्वास संपादन करता आला. बोलल्याप्रमाणे जर आचरण नसेल तर त्याचे काय परिणाम होतात यांवर आपले पंतप्रधान अधिक बोलू शकतील.
या महात्म्याच्या एका हाकेवर सर्व जनता उपोषण आंदोलन करण्यास का तयार व्हायची ? कारण त्यांना हा महात्मा आपला वाटत होता गांधी बाबाच या अन्यायी व्यवस्थेला योग्य रितिने टक्कर देऊ शकतील हा विश्वास त्यांच्या मनात होता गांधीजींच जस जनतेवर प्रेम होतं तसं जनतेनेही गांधीजींवर खूप प्रेम केलं एकीकडे देशाला स्वातंत्र्य मिळाल होत पण फाळणीमुळे तसेच जिनांच्या आततायी कृतीमुळे देशभरात हिंदू मुस्लिम दंगलीने उग्र स्वरूप धारण केले होते. नौखालीत होत असलेली दंगल थांबविण्यासाठी गांधीजी पूर्ण प्रयत्न करत होते पण दंगल थांबत नव्हती. अखेर गांधीजींनी १ सप्टेंबरला उपोषणाला सुरवात केली पुढच्या दोनच दिवसांत त्यांची तब्येत ढासळली अवघ्या ३-४ दिवसात दंगल थांबली. नंतर माउंट बॅटनने गांधीजींना पत्र लिहिलं. “पंजाबात आमची ५५ हजारांची सेना शांतता प्रस्थापित करू शकली नाही परंतु एका माणसाच्या सेनेने कलकत्त्यात अभूतपूर्व शांतता निर्माण केली.” हा गांधीजींच्या व्यक्तिमत्वाचा, कार्याचा प्रभाव होता. भारतीय जनतेचं या महात्म्यावर किती प्रेम होत ते या घटनेवरून लक्षात येतं. हिंदू मुस्लिम ऐक्य प्रस्थापित करून देशाला एकसंध ठेवणारे, राष्ट्रीय एकात्मतेला बळकट करणारे गांधीजी कट्टरतावादी लोकांना आवडले नाहीत. हा देश हिंदूंइतकाच मुस्लिम आणि ख्रिश्चनांचा देखील आहे ही गांधीजींची सर्वसमावेशक राष्ट्रवादाची भूमिका कट्टरतावादी लोकांना आवडण शक्यच नव्हतं. गांधीजींना मारण्याचे अनेक प्रयत्न फसले होते पण शेवटी नथुराम गोडसेने गांधीजींच्या निधड्या छातीवरती गोळ्या झाडून आपली लायकी दाखवून दिली. ज्यांच्यावर गांधींच्या खुनाचा आरोप होता त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नानाजी देशमुख नारायणभाई देसाईंना म्हणतात की “पाच हजार वर्षाचा इतिहास मी वाचला आहे त्यात एक माणूस असा मिळाला की त्याने जे काम हाती घेतल ते समग्रतेच्या भावनेनं केलं – तो माणूस महात्मा गांधी होता.” अर्थात कोण काय म्हणतंय यावरून मोहनदास करमचंद गांधी यांची महानता ठरत नाही १९४८ पर्यंत गांधीजींनी ३० उपोषणे केली, ती काही कोणाच्या सांगण्यावरून नाही. ती उपोषण त्यांच्या आतल्या आवाजाच्या प्रेरणेतून केलेली होती. आतला आवाज जिवंत असण, तो ऐकणं आणि त्यानुसार वागणं या साऱ्यातच गांधीजींच महात्म्य दडलं होत. सत्य, अहिंसा, स्वावलंबन, धर्मनिरपेक्षता आणि सहिष्णुता मूल्यांची शिकवण देणारे गांधीजींचे जीवन हे एक आदर्श जीवनमूल्यांचा वस्तुपाठच असल्याची जाणीव “माझे सत्याचे प्रयोग” हे गांधीजींचं आत्मचरित्र वाचताना होते. गांधीजींच्या विचारांप्रमाणे जगण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहील. गांधीजींच्या जन्माची १५० वर्षे आपण साजरी करत आहोत. काळावर छाप पाडलेला व्यक्तिचुंबक म्हणून त्यांचं हे स्थान आणखी ठळक होत जाईल यात तिळमात्रही शंका मला वाटत नाही.
(संदर्भ पुस्तक – अज्ञात गांधी)
युगपुरुषाला विनम्र अभिवादन
मयुर डुमने
7775957150
(लेखक रानडे इन्स्टिट्युट, पुणे येथे पत्रकारितेचे शिक्षण घेत आहेत)