नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या आधीच विविध राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये कॅबिनेट मंत्री थावरचंद गेहलोत यांना मंत्रिपदावरून हटवून कर्नाटक राज्याचे राज्यपाल करण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून आदेश देण्यात आले आहेत.
राज्यपालांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे
मिझोरामचे राज्यपाल पदी हरि बाबू कमभमपति, मध्य प्रदेशच्या राज्यपालपदी मंगूभाई छगनभाई पटेल, हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मिझोरामचे सध्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांना गोव्याचे राज्यपाल, हरियाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांना त्रिपुराचे राज्यपाल, त्रिपुराचे राज्यपाल रमेश बैस यांना झारखंडचे राज्यपाल, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांना हरियाणाच्या राज्यपाल पदी नियुक्ती देण्यात आली आहे. येत्या २ दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री गेहलोत यांना हटविण्यात आले आहे.
आजची बैठक रद्द
आज सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी मोठ्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, जे पी नड्डा, राजनाथ सिंह, निर्मला सितारामन, धर्मेंद्र प्रधान, पीयूष गोयल, प्रह्लाद जोशी आणि नरेंद्र सिंह तोमर हे उपस्थित राहणार होते. परंतु नरेंद्र मोदी यांनी काल रात्रीच गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे सचिव बी एल संतोष यांची भेट घेतली. या भेटीनंतर आजची बैठक रद्द करण्याच निर्णय घेण्यात आला आहे.