हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्यातील वाद काही नवा नाही. काही दिवसांपूर्वी अमित शहा यांनी पश्चिम बंगालमधील बांकुडा जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी एका आदिवासी कुटुंबाच्या घरी भोजन केले. मात्र यावरून आता ममता बॅनर्जी यांनी हल्लाबोल केला आहे. आदिवासी कुटुंबासोबत शहा यांनी केलेलं भोजन म्हणजे फक्त दिखावा असल्याचा आरोप ममता यांनी केला.
अमित शहा यांच्यासाठी तयार करण्यात आलेलं जेवण हे फाइव्ह स्टार हॉटेलमधून मागवण्यात आलं होतं” असा दावा त्यांनी केला आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार ममता यांनी हे पदार्थ ब्राह्मण आचाऱ्याकडून बनवून घेण्यात आल्याचाही दावा केला.तसेच शहा यांनी बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याऐवजी दुसऱ्याच पुतळ्याला हार घातला. नंतर हा पुतळा एका शिकाऱ्याचे असल्याचे समोर आलं होतं अशी आठवण देखील ममतांनी स्थानिकांना करुन दिली आहे.
अमित शाह हे ५ नोव्हेंबर रोजी बांकुडामध्ये पोहचले तेव्हा त्यांनी आदिवासी कुटुंबाच्या घरी जेवण केलं. जमीनवर पंगतीमध्ये बसून जेवतानाचा अमित शाह यांचे फोटो सोशल नेटवर्किंगवर पाहायला मिळाले. चतुर्दिही गावामध्ये राहणाऱ्चया विभीषण हंसदा यांच्या घरी शाह यांनी केळीच्या पानावर शाकाहारी जेवणाचा आनंद घेतला. जे फोटो समोर आले त्यामध्ये अमित शाह यांनी वरण, भात, पोळी आणि भाज्यांचा आस्वाद घेतल्याचे पहायला मिळाले. यावेळी अमित शाह यांच्यासोबत त्यावेळी पक्षाचे महासचिव कैलाश विजयवर्गीय आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय तसेच प्रदेशाध्यक्ष दिलीप घोषही होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’