रूपाली चाकणकर यांना धमकी देणाऱ्या आरोपीस अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांना काल एका इसमाने फोनवरून धमकी देण्याचा प्रकार घडला. संबंधित घटनेची गंभीर दखल गृह विभागाकडून घेण्यात आली असून धमकी देणाऱ्या नगर नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील येथील भाऊसाहेब शिंदे नावाचा इसमाला नगर तालुका पोलिसांनी रात्रीच अटक केले आहे. त्याला आज दुपारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. संबंधित युवक हा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिल्ली येथे असणाऱ्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या हेल्पलाइन नंबरवर सोमवारी दुपारी 3 वाजून पन्नास मिनिटांनी एका व्यक्तीने फोन केला होता. त्यामध्ये त्या व्यक्तीने रुपाली चाकणकर यांचे नाव घेऊन त्यांना पुढील 72 तासात जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दिल्ली येथील राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयाने मुंबई येथील राज्य महिला आयोगाच्या कार्यालयाशी संपर्क करून ही माहिती दिली. त्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती कळविण्यात आली होती.

दरम्यान, ज्या नंबरवरून फोन आला त्या व्यक्तीशी संपर्क केला असता ती व्यक्ती अहमदनगर जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर नगर जिल्ह्यातील पोलिसांनी तत्काळ तपासाची गती वाढवत त्या व्यक्तीचा शोध घेतला असता ती नगर जवळील चिचोंडी पाटील या गावातील असल्याचे समजले. दरम्यान त्या व्यक्तीला रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले.

Leave a Comment