मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमध्ये एक पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एका नराधमाने महिलेवर बलात्कार केला. यादरम्यान त्याने एक अश्लील व्हिडीओ बनवला. त्यानंतर संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून त्याने पीडितेकडून साडेपाच लाखांची खंडणी मागितली. या महिलेने पैसे दिले नाहीत म्हणून आरोपीने पीडित महिलेच्या पतीला बलात्काराचा व्हिडिओ पाठवला. पण महिलेच्या पतीने तिला साथ देण्याच्या ऐवजी या व्हिडिओच्या माध्यमातून तो महिलेकडून घटस्फोटाची मागणी करु लागला. आरोपी पतीने “घटस्फोट दे नाहीतर बलात्काराचा अश्लील व्हिडीओ शेअर करेन”, अशी धमकी आपल्या पत्नीला दिली. यानंतर पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
आरोपी पती महिलेला सारखा त्रास देत होता. आरोपी पती तिने घटस्फोट द्यावा यासाठी तो पीडितेला मानसिक आणि शारीरिकरित्या छळत होता. यानंतर आरोपी पतीच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने अखेर पोलीस ठाण्यात जाण्याचा निर्णय घेतला. तिने पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार केली. पीडित महिला जेव्हा पोलीस ठाण्यात गेल्याची माहिती आरोपी पतीला मिळाली तेव्हा आपण पकडले जाऊ या विचाराने तो घरातून फरार झाला. तो त्याच्या उत्तर प्रदेशातील मूळगावी श्रावस्ती येथे पळाला. यानंतर पोलिसांनी त्याला त्या ठिकाणी जाऊन बेड्या ठोकल्या.
आरोपी पतीला पकडल्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. या दुसऱ्या आरोपीने महिलेवर बलात्कार केला होता आणि तिच्याकडे साडेपाच लाखांची मागणी केली होती. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक केली आहे. पोलिसांनी या आरोपींविरोधात बलात्कार, खंडणी सारखे आणखी काही गुन्हे दाखल केले आहेत.