भुजबळांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून ते जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न करतायेत! जरांगे पाटलांचा गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण पेटले दिसत आहे. अशातच ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाद देखील शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, आज मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. “भुजबळ यांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून ते जातीय दंगली करण्याचा प्रयत्न करत आहेत” असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

आज माध्यमांशी संवाद साधताना, “ज्यांनी 30-35 वर्ष या राज्यात घटनात्मक पद सांभाळले, मंत्री म्हणून काम केले, त्या व्यक्तीचे एवढे भयान विचार होते हे आज बाहेर आले. इथून मागे त्यांनी जनतेचे किती हात केले असतील हे समोर आले. उशीरा का होईना पाप बाहेर पडले आहे” अशा शब्दात जरांगे पाटील यांनी भुजबळांवर जोरदार टीका केली आहे.

इतकेच नव्हे तर, “वैचारिक मतभेद असले तर काही नाही, पण व्यक्तीगत मनभेद नको. आता ते पातळी सोडल्यामुळे ओबीसींसह मराठा समाजाच्या नजरेतून उतरले आहेत. जातीय दंगली घडवण्याचा त्यांनी कट रचला होता आणि त्यांची महत्त्वाकांक्षा काय आहे हे ओबीसी बांधवांसह जनतेच्या लक्षात आले. त्यांना मुख्यमंत्री व्हायचंय आणि त्यासाठी जातीय दंगली घडवायच्या आणि गोरगरिबांच्या, ओबीसी बांधवांची लेकरी गुंतवायची” असे गंभीर आरोप जरांगे पाटलांनी भुजबळांवर लावले आहेत.