हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून राज्यभरात सभा घेतल्या जात आहेत. दरम्यान, काल कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर मध्यरात्री १ वाजता जरांगे पाटील यांची विराट सभा पार पडली. सभेनंतर त्यांनी आज सकाळी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिसंगम येथील स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत ओबीसी नेत्यांवर तसेच राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. निजामशाहीचा विचार मेंदूत भिनलेल्यांकडून राज्यात जातीय दंगली घडवण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी भुजबळांचे नाव न घेता केले.
कराड येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास पार पडलेल्या सभेस लाखो मराठा बांधवांची उपस्थिती पाहून जरांगे पाटील थक्क झाले. या ठिकाणी कडाक्याच्या थंडीत मराठा बांधव व भगिनींनी उपस्थिती दाखवून पुन्हा एक मराठा लाख मराठा असा जयघोष करत एकजूट दाखवून दिली. दरम्यान, आज सकाळी सातारा येथे जाण्यापूर्वी कराडच्या दत्ता चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन केले.
जरांगे पाटील यांनी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या कोयना आणि कृष्णा नदीकाठावरील प्रीतिसंगम स्मृतिस्थळी जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, छगन भुजबळ यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत. मराठा-ओबीसीनी एकमेकांच्या अंगावर जाऊ नये, ही राजकीय मंडळी आपल्यात झुंज लाऊ शकतात. पण माझं मराठा तरुणांना आवाहन आहे की तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका त्यांचा डाव यशस्वी होऊ देऊ नका.
https://www.facebook.com/watch/?v=182133928302882
काहींना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून त्यांच्याकडून भडखाऊ भाषणे करून जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावरून अपेक्षा करतो की आत्ताचे मुख्यमंत्री लवकरात लवकर आरक्षण देतील टाईम बॉण्ड ही देतील. शिवाय मंत्री भुजबळ यांना समजूनही सांगतील. उशिरा का होईना पाप बाहेर आले आहे. दंगली घडवण्यासाठी वक्तव्य सुरु आहेत. वैचारिक विचार मांडले पाहिजे. तो माणून ओबीसीसह मराठा समाजाच्या मनातून उतरला असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.