औरंगाबाद : जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यात एका डॉक्टर पतीने आपल्या पत्नीचा अमानुष छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीनं ‘रुग्णालय बांधण्यासाठी माहेरून 20 लाख रुपये घेऊन ये, अन्यथा घटस्फोट दे’ असं म्हणत विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे. पैशांसाठी आरोपी पतीसह सासू, सासरे आणि दीर यांनी देखील मारहाण केल्याचा आरोप पीडितेनं फिर्यादीत केला आहे.
या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. पती प्रद्युम्न सुनील अंबेकर, सासू अलका सूनील अंबेकर, सासरे सुनील रंगनाथ अंबेकर आणि दीर अनिरुद्ध सुनील अंबेकर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. ‘तू नोकरी करत नाही, तू काही कमवत नाही’ असं म्हणत चारही आरोपींनी पीडितेला मारहाण केल्याचा आरोपी फिर्यादीत करण्यात आला आहे. 6 डिसेंबर 2015 फिर्यादीचा विवाह कन्नड तालुक्यातील पिशोर येथील रहिवासी असणाऱ्या प्रद्युम्न याच्याशी झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस आनंदात गेल्यानंतर, आरोपींनी पीडितेला त्रास द्यायला सुरुवात केली.
आरोपीनं नवीन हॉस्पिटल उभारण्यासाठी माहेरहून 20 लाख रुपये घेऊन ये, यासाठी तगादा लावला होता. त्यासाठी पीडितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे. पीडितेला अनेकदा घरातून हाकलून दिलं आहे. 23 जुलै 2019 मध्ये पीडितेला मुलगा झाल्यानंतर तीन महिन्यांनी नातेवाईकांनी दोघांमध्ये समेट घडवून आणली.त्यानंतर पीडित महिला पुन्हा नांदायला गेली. पण त्यानंतरही पतीचा त्रास कमी झाला नाही. मुलाच्या पहिल्याच वाढदिवशी सासरच्यांनी पीडितेला पुन्हा घरातून हाकलून दिलं. माहेरी आल्यानंतर तब्बल 6 महिन्यांनी पीडित विवाहितेनं फुलंब्री पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.