विवाहितेची दोन चिमुरड्यासह विहिरीत उडी टाकून आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

विटा येथील शाहूनगर येथील एका 26 वर्षीय विवाहितेने आपल्या दोन चिमुरड्यासह विहिरीत उडी टाकून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दुपारी घडली. सोनाली बिहुदेव हात्तेकर असे या आत्महत्या केलेल्या दुर्दैवी विवाहितेचे नाव असून तिने तिची चार वर्षाची मुलगी आरोही व एक महिन्याच्या बाळाला घेऊन विहिरीत उडी टाकून आपली जीवनयात्रा संपविली. या ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने विटा शहरासह खानापूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. या आत्महत्येचे नेमके कारण अद्यापपर्यंत समजू शकलेले नाही.

विटा येथील शाहूनगर परिसरातील नगरपालिका शाळा नं. 13 जवळ हात्तेकर कुटुंब भाड्याच्या खोलीत वास्तव्यास आहे. सोमवारी सकाळी विवाहिता सोनाली हत्तेकर ही आपली चार वर्षाची मुलगी आरोही आणि एक महिन्याच्या बाळाला घेऊन घरातून बाहेर पडली. त्यानंतर कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र सोनाली व दोन चिमुरडे कुठेही आढळून आले नाहीत.

त्यानंतर आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास येथील नेवरी रस्त्यावरील शिवाजीनगर येथे राजेंद्र शितोळे यांच्या विहिरीत एका महिलेने दोन चिमुरड्यासह आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी समजली. त्यावेळी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी विवाहिता सोनाली हिच्यासह तिच्या दोन चिमुरड्यांचे मृतदेह विहिरीतील पाण्यात तरंगताना दिसून आले. पोलीसांनी स्थानिक नागरिकांच्या आणि क्रेनच्या मदतीने या तिघांचे मृतदेह विहिरीतील पाण्यातून बाहेर काढून विटा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले.

Leave a Comment