हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच मुंबईमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील कुर्ला येथील एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीमध्ये 39 जण जखमी झाले असून सुमारे 60 लोकांना इमारतीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्नीशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यांच्याकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सर्व प्रयत्न केले जात आहेत. इमारतीला आग लागल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात देखील खळबळ माजली आहे.
कुर्ला येथील कोहिनूर हॉस्पिटलसमोर असणाऱ्या १२ मजली इमारतीत आग लागल्याने परिसरात गोंधळ उडाला होता. यानंतर त्वरित अग्नीशामक दलाला घटनास्थळी बोलवून घेण्यात आले. तसेच, त्वरित बचाव पथकाकडून इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. आगीमुळे इमारतीत जवळपास 60 ते 70 लोक अडकले होते. यातील बऱ्याच लोकांना इमारतीतून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. तसेच जखमी झालेल्या 39 जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अद्यापही आग का लागली याचे कारण समोर आलेले नाही. सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांच्याकडून तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच, अग्निशामक दलाला देखील आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. इमारतीला आग लागल्यानंतर परिसरातील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तसेच सर्व जखमींवर उपचार प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.