कराचीतील शॉपिंग मॉलला भीषण आग; 9 जणांचा होरपळून मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज पाकिस्तानाच्या कराचीमधील रशीद मिन्हास रोडवर असलेल्या आरजे मॉलला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या आगीत 9 जणांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. याबाबतची माहिती डॉन न्यूजकडून देण्यात आली आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग विझवल्यानंतर आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. परंतु अद्यापही आग कशी लागली याबाबत माहिती समोर आलेली नाही.

समोर आलेल्या माहितीनुसार, आज पहाटे 5:30 वाजता अग्निशामक दलाला आग लागल्याची माहिती मिळाली होती. यानंतर त्यांनी घटनास्थळी दाखल होत बचावकार्यास सुरुवात केली. ही आग भिजवण्यासाठी 8 अग्निशमन दल, 2 स्नॉर्कल्स आणि 2 बाउझर घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. जवानांच्या प्रयत्नानंतर त्यांना एकूण 22 लोकांना मॉलमधून वाचवण्यात यश आले. यानंतर त्यांनी जखमी झालेल्या सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु यामध्ये उपचारादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

मुख्य म्हणजे, मॉलला लागलेल्या या भीषण आगीत 9 जणांना आपला जीव गमवावा लागला. सांगितले जात आहे की, ज्या मॉलला ही आग लागली होती ती एक मोठी व्यावसायिक इमारत होती. या मॉलमध्ये अनेक शॉपिंग सेंटर, कॉल सेंटर आणि सॉफ्टवेअर हाऊस होते. त्यामुळे आग वेगाने पसरत गेली. यानंतर आगीची दाहकता पाहता अग्निशामक दलाच्या जवानाने तातडीने सर्वांना मॉलमधून बाहेर काढले. दरम्यान, या दुर्घटनेनंतर माध्यमांकडून सांगण्यात येत आहे की, कराचीच्या 90 टक्के इमरतींमध्ये अग्निविरोधक सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे घटनास्थळी असलेल्या लोकांना बचावासाठी कोणतेही प्रयत्न करता आले नाही.