हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुंबईतील गोरेगावमध्ये एका इमारतीच्या पार्किंगला भीषण आग लागली आहे. या आगेमध्ये 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच 40 जण जखमी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत अग्निशामक दलाने तब्बल 30 जणांना सुखरूपपणे इमारतीच्या बाहेर काढले आहे. मुख्य म्हणजे, आगीचे स्वरूप गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या या आगेमुळे गोरेगाव परिसरात गोंधळ उडाला आहे. मात्र अद्याप या आगीचे प्रमुख कारण समोर आलेले नाही.
समोर आलेल्या माहितीनुसार, गोरेगाव पश्चिममधील जय भवानी मारुतीच्या पार्किंगमध्ये मध्यरात्रीच्या वेळी ही आग लागली. ही इमारत पाच मजली असून या इमारतीत राहणाऱ्या लोकांची संख्या देखील जास्त आहे. याच इमारतीच्या पार्किंगला लेव्हल 2 स्वरूपाची आग लागल्यामुळे परिसरात गोंधळ उडाला. यानंतर ताबडतोब पोलिसांना घटनास्थळी बोलावून घेण्यात आले. या आगीचे स्वरूप गंभीर असल्यामुळे पोलिसांनी तातडीने अग्निशामक दलाच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले. तसेच, 30 जणांना सुखरूपपणे बाहेर काढले. मात्र या घटनेमध्ये 7 जणांचा होळपळून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 1 पुरुष, 3 महिला आणि 2 अल्पवयीन मुलींचा समावेश आहे.
दरम्यान, सध्याच्या घडीला अग्नीशामक दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. तसेच जखमी झालेल्या सर्व व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमध्ये इमारतीच्या तळमजल्यावर असलेली काही दुकाने आणि गाड्या जळून खाक झाल्या आहेत. ही आग मध्यरात्री लागल्यामुळे झोपेत असलेल्या नागरिकांना ही बाब लवकर लक्षात आली नाही. त्यामुळे आगीने जास्त पेट घेतला. अद्याप या आगीचे मुख्य कारण समोर आलेले नाही.