हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या विजयात मायावती आणि एमआयएम चे असदुद्दीन ओवेसी यांचे योगदान आहे असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला चिमटा काढला आहे. ते मुंबई येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, उत्तरप्रदेश हे भाजपचेच राज्य होते मात्र तरीही अखिलेश यादव यांच्या जागा मागील वेळेपेक्षा तीन पटीने वाढल्या. भाजपने उत्तरप्रदेशात जो विजय मिळवला आहे त्यातच मायावतीचं योगदान आहे. ओवेसींचंही आहे. त्यांना पद्मविभूषण, भारत रत्न द्यावं लागेल. असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, पंजाब मध्ये आम आदमी पक्षाने मिळवलेल्या यशा वरूनही त्यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजप हा प्रखर राष्ट्रवादी पक्ष आहे. तसेच पंजाब हे सीमावर्ती प्रदेशाजवळचं राज्य आहे. तरीही या सीमावर्ती राज्यातील मतदारांनी त्यांना नाकारलं आहे. पंतप्रधानांपासून संरक्षण मंत्र्यांनी पंजाबची सत्ता मिळवण्यासाठी जोर लावला होता. तुम्ही तरी का हरले? असा सवाल संजय राऊत यांनी केला