आजपासून सुरू होणारी लसीकरणाची मेगा मोहीम संकटात

शहरात दोन दिवस पुरेल एव्हढाच साठा शिल्लक

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा या उद्देशाने शासनाने लसीकरण मोहिमेला वेग दिला आहे. शहरात दररोज २ हजार नागरिकांना लस देण्यात येत आहे. महापालिकेकडे केवळ ४ हजार लसींचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे आज १ एप्रिलपासून सुरू होणारी लसीकरणाची मेगा मोहीम संकटात सापडली आहे. कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा, या उद्देशाने शासनाकडून महापालिकेला लसीचा पुरवठा केला जात आहे. महापालिकेकडून शासनाकडे लसीच्या गरजेनुसार नोंदणी करण्यात येत आहे. चार दिवसांपूर्वी मनपाला दहा हजार लसीचा साठा शासनाकडून प्राप्त झाला होता. दररोज २ हजार लस वापरण्यात येत आहेत.

दोन दिवसात ४ हजार लस संपल्या. मंगळवारी ६ हजार लसीचा साठा शिल्लक होता, त्यापैकी दोन हजार लस मंगळवारी संपल्यामुळे केवळ ४ हजारचा साठा शिल्लक आहे. दोन दिवस हा साठा पुरेल. साठा संपत आल्यामुळे पालिकेने शासनाकडे मागणी नोंदवली आहे. नवीन साठा लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. शासनाकडून लस वेळेवर उपलब्ध न झाल्यास लसीकरण मोहीम एक ते दोन दिवस थांबवावी लागेल. आज १ एप्रिलपासून ४५ पेक्षा जास्त वय असलेल्या प्रत्येक नागरिकाला लस देण्यात येणार आहे.

४८ ठिकाणी होणार लसीकरण

महापालिकेने लसीकरणाची मेगा मोहीम राबवण्याचे ठरवले आहे. त्याचे नियोजनदेखील केले जात आहे, सध्या ४८ ठिकाणी लसीकरण केले जात आहे, ही संख्या आता १०० पर्यंत वाढवली जाणार आहे. मेगा लसीकरण मोहिमेसाठी लस उपलब्ध होण्याचे प्रमाण कमी असेल तर मोहीम कशी राबवायची, असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like