एअरबस- GSV मध्ये सामंजस्य करार!! विमान वाहतूक बळकट होणार; 15 हजार नोकऱ्या मिळणार

AirBus And GSV
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतातील पहिले परिवहन विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडोदरा येथील गती शक्ती विद्यापीठ आणि एयरबसमध्ये एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. भारतीय विमान वाहतूक क्षेत्राला बळकट करण्याच्या उद्देशाने हा करार करण्यात आला आहे. या करारामुळे तब्बल 15 हजारपेक्षा जास्त नोकऱ्यांची संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. एयरबसने भारतातील 15 हजार विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिल्यामुळे हा करार अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

या कराराचा स्वाक्षरी समारंभ रेल्वे भवन येथे गुरुवारी पार पडला. यावेळी, एयरबस इंडियाचे अधिकारी, दक्षिण आशियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रेमी मेलर्ड तसेच GSV चे कुलगुरू प्रा. मनोज चौधरी यांच्याकडून अधिकृतपणे भागीदारीवर शिक्कामोर्तब करण्यात आला. गेल्या 2022 मध्येच गती शक्ती विश्व विद्यालय (GSV) वडोदराची स्थापना करण्यात आली आहे. तेव्हापासून GSV विद्यापीठ अनेक महत्त्वाचे करार करताना दिसत आहेत. अलीकडेच विद्यापीठाकडून गुजरातमध्ये अत्याधुनिक C295 विमान सुविधा स्थापन करण्याच्या संदर्भात घोषणा करण्यात आली होती. या घोषणाच्या आधारावर आता विद्यापीठाकडून दुसरा करार करण्यात आला आहे.

एयरबससोबत झालेला संयुक्त करार एरोस्पेस क्षेत्रात नाविन्य, डिझाइन, उत्पादन आणि विकास वाढवण्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे. याची माहिती देताना एयरबसचे प्रेसिडेंट रेमी मेलर्ड यांनी म्हणले की, “भारतातील विमान निर्मिती व्यवस्था विकसित करण्यासाठी वचनबद्ध असलेली कंपनी म्हणून, मनुष्यबळ विकासामध्ये गुंतवणूक करण्याची आमची जबाबदारी आहे. गती शक्ती विद्यापीठासोबतची भागीदारी देशातील कुशल कामगारांची एक मजबूत साखळी विकसित करेल जी भविष्यात वेगाने वाढणाऱ्या एरोस्पेस क्षेत्राला सेवा देण्यासाठी सज्ज असेल”

दरम्यान, या उद्योग आणि शैक्षणिक भागीदारीमुळे, नियमित विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी क्षेत्र-विषयक कौशल्य अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करणे सहज शक्य होणार आहे. त्याचबरोबर, या कराराअंतर्गत सहसंशोधन आणि उद्योगाचा अनुभव विद्यार्थ्यांना देणे, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि प्लेसमेंट उपलब्ध करणे, शिष्यवृत्ती कार्यक्रम तयार करणे अशा गोष्टींना प्राधान्य दिले जाईल. मुख्य म्हणजे उद्योगांच्या गरजेनुसार, भारतीय विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. एअरबस इंडियन ऑपरेशन्समध्ये 15 हजार विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याची शक्यता असेल.