हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटीचे सरकार मध्ये विलीनीकरण व्हावे म्हणून गेल्या २ महिन्यांपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानभवनात भाष्य करता म्हंटल कि, एसटी कामगाराचं शासनात विलिनीकरण शक्य नाही त्यामुळे विलीनीकरणचा विषय डोक्यातून काढून टाका. कुणाचेही सरकार असले तरी त्या सरकारला हे शक्य नाही असे स्पष्ट मत अजित पवारांनी मांडलं
एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीचा चेंडू हायकोर्टात आहे, हायकोर्टाच्या निर्देशावरुन विलिनीकरणाची शक्यता तपासण्यासाठी एक समिती स्थापन झालेली आहे. त्या समितीने आपला अभ्यास सुरु केलेला आहे, त्या समितीने अभ्यासासाठी मुदत वाढ मागितल्याची माहितीही त्यांनी सभागृहाला दिली. समितीचा अहवाल येईल तेव्हा येईल पण एसटी कामगार-कर्मचाऱ्याचं शासनात विलिनीकरण शक्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
विलीनीकरणाबाबत उच्च न्यायालय अंतिम निकाल देईलच, पण आज एका महामंडळाचं विलिनीकरण केलं तर उद्या अनेक महामंडळाकडून विलिनीकरणाची मागणी पुढे येईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. सरकारने बहुतांशी मागण्या पूर्ण केल्याने कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे. अन्यथा गिरणी कामगार जसे देशोधडीला लागले तशी वेळ एसटी कर्मचाऱ्यांवर येऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मुंबईतील गिरणी कामगारांचा संप तांत्रिकदृष्ट्या अजूनही मागे घेतलेला नाही. या संपामुळे मुंबईतला गिरणी कामगार उध्वस्त झाला,असेही अजित पवार म्हणाले