Friday, June 2, 2023

शाळा सुरु करण्यासाठी मेस्टा, मेसा संघटना आक्रमक

औरंगाबाद – राज्यातील शाळा सुरु करण्यासंबंधी सर्वच संस्थाचालक आणि शिक्षक संघटनांकडून जोरदार मागणी होत आहे. त्यातच इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संघटना असलेल्या मेस्टा आणि मेसा या दोन संघटना जास्त आक्रमक झाल्या आहेत. राज्य सरकारने शाळा सुरु करण्यासाठी परवानगी द्यावी, अन्यथा कारवाई झाली तरी चालेल, आम्ही शाळा सुरु करणारच, असा इशारा या संघटनांनी दिला होता. त्यानुसार आज मेस्टा संघटनेच्या वतीने औरंगाबादच्या ग्रामीण भागातील काही शाळा सुरु करण्यात आल्या. तर मेसा संघटनेने औरंगाबादमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांसमोर निदर्शने केली.

औरंगबादमध्ये मेसा संघटनेचे अध्यक्ष प्रल्हाद शिंदे यांच्या नेतृत्वात शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. काळे कपडे घालून याठिकाणी सदस्यांनी आंदोलन केले. 27 जानेवारीपर्यंत शाळा सुरु करण्याची परवानगी द्या, अन्यथा आम्ही कठोर निर्णय घेऊ, असा इशारा संघटनेने दिला आहे.

औरंगाबादमधील महाराष्ट्र इंग्रजी स्कूल ट्रस्टीज असोसिएशन अर्थात मेस्टा संघटनेने आजपासून म्हणजेच 17 जानेवारीपासून शाळा सुरु करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार, ग्रामीण भागातील काही शाळा सुरु करण्यात आल्याची माहिती मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय तायडे पाटील यांनी दिली.